Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन

Admin | 24 views
तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन

शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

सांगली, दि. १२ (जि. मा. का.) : राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज मिरज तालुक्यातील तुंग आणि वाळवा तालुक्यातील आष्टा, कारंदवाडी येथे भेट देऊन 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पाणंद रस्त्यांचे उद्‌घाटन करून पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार राजशेखर लिंबारे आदि उपस्थित होते.

तुंग येथे तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या सामंजस्याने तयार करण्यात आलेल्या कृष्णानंद पाणंद रस्त्याचे उद्‌घाटन अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, वाळवा तालुक्यातील आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्यांचेही उद्‌घाटन श्री. खारगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रस्त्याची पाहणी करून त्यांनी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयामुळे पाणंद रस्ता झाला आहे. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांनी पाणंद रस्ता खुला केल्याबद्दल समाधान व्यक्त करून अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी अशोक काकडे व महसूल प्रशासनाचे आभार मानून सत्कार केला.

पूर्वी रस्ता नसल्याने त्रास होत होता. मात्र आता हा रस्ता झाल्यामुळे वहिवाट सुलभ झाली असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी त्यांचे रस्ता होण्यापूर्वी व रस्ता झाल्यानंतरचे अनुभव कथन केले. शेतात जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता उपलब्ध असणे हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहे. शेत व पाणंद रस्ते हे शेतमाल बाजारात पोहोचवण्यासाठी व शेतातील यंत्रसामग्री नेण्यासाठी आवश्यक असलेले मार्ग आहेत. पाणंद रस्ते खुले झाल्यामुळे शेतीसाठी वाहतूक व दळणवळणाची सोय उपलब्ध होऊन शेतीमाल आणि यंत्रसामग्रीची वाहतूक करणे सोपे होत असल्याची भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

मिरज तालुक्यात ‘सेवा पंधरवडा’ अभियानाचा अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या हस्ते शुभारंभ; महसूल योजना वाहिनी”स हिरवा झेंडा

महाराष्ट्र शासनामार्फत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि. 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दि. 02 ऑक्टोबर रोजी जयंती या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये महसूल विभागाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे कामी “सेवा पंधरवडा उपक्रम” आयोजित केलेला आहे. या अनुषंगाने मिरज तहसील कार्यालयामार्फत उपस्थितीत “महसूल योजना वाहिनी” या वाहनास राज्याचे अपर मुख्य सचिव, महसूल विकास खारगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वाहनाच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरपर्यंत मिरज तालुक्यातील सर्व गावात महसूलच्या विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

सेवा पंधरवडा अंतर्गत 17 सप्टेंबर रोजी मिरज तालुक्यातील सर्व गावात विशेष ग्रामसभा आयोजित करून गावातील सर्व शिव रस्ते, पाणंद, गाडी मार्ग, पाय मार्ग या रस्त्यांची पडताळणी करणे व त्याची नोंद शासन दप्तरी घेणे बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र अर्जदार यांना जमीन वाटप करण्याची कार्यवाही, तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिव्यांग लाभार्थी यांना संजय गांधी योजना लाभ मंजूर करण्यात देण्याबाबत लोकाभिमुख उपक्रम आयोजित केला असल्याची माहिती मिरजच्या तहसीलदार डॉ. मोरे-धुमाळ यांनी दिली.

000


Join WhatsApp