
यवतमाळ, दि . २६ : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हा त्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज व्यक्त केला.
उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते दिग्रस ग्रामीण रुग्णालयात झाला त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ श्रीकृष्ण बानोत उपस्थित होते.

आयुष्मान भारत योजना आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजना यांच्यामार्फत समाजाला आरोग्यपूर्ण, सुरक्षित आणि सक्षम बनविण्याचे कार्य सुरू आहे. त्याच धर्तीवर हे अभियान हाती घेतले आहे.या अभियानांतर्गत महिलांच्या सर्वांगीण आरोग्यसुरक्षेसाठी तज्ज्ञांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाद्वारे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, तसेच पोषक आहार, मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करणे, विशेष म्हणजे आहार आणि शिक्षणाचे महत्त्व सांगितले जाणार असून मुलांच्या संगोपनात पुरुषांच्या भूमिकेवरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या अभियानाअंतर्गत रक्तदाब, शुगर,कॅन्सर, प्रसूतीपूर्व तपासणी, सर्व प्रकारचे लसीकरण, क्षयरोग, टीबी, एच आय व्ही, दंत तपासणी, अस्थमा, सिकलसेल, ऍनिमिया, सारख्या अनेक आजारांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत आणि या आजारावर विशेष मार्गदर्शन सुद्धा रुग्णांना दिले जाणार आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन केले जात असून महिला भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री श्री. राठोड यांनी केले.
या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ आशिष पवार, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय दिग्रस डॉ वीरेंद्र अस्वार, स्त्रीरोग तज्ञ डॉ श्याम जाधव, माजी सभापती मिलिंद मानकर, डॉ. संदीप दुधे, राजकुमार वानखडे, दिग्रस ठाणेदार वैजनाथ मुंडे, संजय कुकडी, डॉ. मनोज टेवरे, उत्तममामा ठवकर तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ अभय गोविंदवार यांनी केले. आभार डॉ श्याम नाईक यांनी मानले
000000
