
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि महिला व बाल विकास मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर २०२५ (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त) ते २ ऑक्टोबर २०२५ (गांधी जयंती) या कालावधीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांचे आरोग्य, पोषण आणि कुटुंब कल्याणाला बळकटी देणे आहे. जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि अंगणवाड्यांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. या ठिकाणी महिलांसाठी मोफत तपासणी, लसीकरण आणि समुपदेशन उपलब्ध आहे. यातून महिलांना आरोग्य साक्षर करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे.

शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये लाखो महिलांना मोफत आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत. या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिक आरोग्य शिबिरांना भेट देऊ शकतात, जिथे आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि अंगणवाड्यांमध्ये विशेष तपासण्या, लसीकरण आणि समुपदेशन उपलब्ध आहे. महिलांना स्थानिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून या शिबिरांची माहिती मिळवता येईल. आरोग्य विभाग जनजागृती मोहिमेद्वारे कुटुंबातील महिलांना प्रोत्साहन देत आहे. राष्ट्रीय पोषण महिन्यात पोषण, मासिक पाळी स्वच्छता आणि कुटुंब नियोजनावर व्याख्यानेही आयोजित केली जात आहेत.
अभियानाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन दीर्घकालीन सामाजिक बदल घडवणे. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग, क्षयरोग, कुष्ठरोग, अॅनिमिया आणि सिकल सेल रोग यांची मोफत तपासणी करून आजारांची लवकर ओळख आणि उपचार शक्य होत आहेत. यामुळे मृत्यूदर कमी होऊन कुटुंबे मजबूत होत आहेत. गर्भवती महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी, लसीकरण, प्रसूतीपूर्व काळजी आणि जननी शिशु सुरक्षा योजना तसेच जननी सुरक्षा योजनेंतर्गत मोफत सेवा देऊन माता-शिशू मृत्यूदर कमी करण्यावर भर आहे. तसेच, पोषण आणि जागरूकता सत्रांद्वारे संतुलित आहार, स्वच्छता आणि कुटुंब नियोजनाचे शिक्षण देऊन कुपोषण दूर होत आहे. प्रत्येक स्त्रीला आरोग्यविषयक आवश्यक सहाय्य आणि मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून तिला आरोग्य साक्षरतेकडे नेण्याचा मार्ग खुला होत आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच पालकमंत्री कोल्हापूर, प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित नसून, महिलांच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यदायी भविष्यासाठी एक व्यापक आराखडा आहे. यात फक्त आजारांची तपासणी नव्हे, तर आरोग्य साक्षरता वाढवणे, महिलांचे आरोग्य बळकट करणे आणि कुटुंबातील प्रत्येक घटकाला सशक्त करणे हा उद्देश आहे. हे अभियान एकदाच होणारा उपक्रम नसून, आरोग्य विभागाची निरंतर चालणारी चळवळ आहे. या चळवळीमुळे महिलांचे आरोग्य सुधारेल, कुटुंब सशक्त होईल आणि परिणामी राज्याचा आरोग्य निर्देशांक उंचावेल.
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ ही संकल्पना महिलांच्या आरोग्य साक्षरतेवर केंद्रित आहे, जी वैयक्तिक आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी आधारस्तंभ आहे. महिलांना आरोग्याविषयी शिक्षण, जागरूकता आणि सुलभ सेवा मिळाल्यास त्या स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या शारीरिक आणि मानसिक गरजा समजून योग्य निर्णय घेऊ शकतात. लहानपणापासून मुलींना पोषण, स्वच्छता आणि प्रजनन आरोग्याचे शिक्षण देणे, समुदाय कार्यशाळा आणि मराठीतून डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे माहिती पुरवणे प्रभावी ठरते. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे, आशा कार्यकर्त्या आणि मोबाइल क्लिनिक्सद्वारे सेवा पोहोचवल्या जात आहेत. पोषण, मासिक पाळी, गर्भनिरोध आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवून सामाजिक गैरसमज आणि लिंगभेद दूर करण्याचे काम होत आहे. आरोग्य साक्षर महिला कुटुंबाला संतुलित आहार, स्वच्छता आणि रोगप्रतिबंधक उपाय शिकवतात, ज्यामुळे मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाची आर्थिक प्रगती साध्य होते. अशा महिलांमुळे सामाजिक बदल घडतो आणि समाज दीर्घकालीन प्रगतीकडे वाटचाल करतो. आरोग्य निर्देशांक वाढवण्याच्या दृष्टीने ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ ही संकल्पना निश्चितच राज्य आणि देशासाठी मैलाचा दगड ठरेल.
०००
- सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर
