
मुंबई, दि. १७ : राज्य शासन स्वच्छ हवा, स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
मुंबई क्लायमेट वीकदरम्यान आयोजित अर्थशॉट प्राईज उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी अर्थशॉट प्राइजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन नॉफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज आदी उपस्थित होते.
जगप्रसिद्ध ‘द अर्थशॉट प्राइज’ या जागतिक पर्यावरणीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नोव्हेंबर 2026 मध्ये मुंबईत होणार असल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली.
भारतात प्रथमच अर्थ शॉट प्राईज उपक्रम होत असल्याचा आनंद व्यक्त करत पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे यांनी या आयोजनासाठी सर्व सहभागी व आयोजकांचे आभार मानले.
मंत्री मुंडे म्हणाल्या, अर्थशॉट उपक्रमाने स्वच्छ हवा, कचरामुक्त जग, निसर्ग संवर्धन, सागरी परिसंस्थेचे पुनरुज्जीवन आणि हवामान सुधारणा या पाच महत्त्वाच्या उद्दिष्टांना प्राधान्य दिले आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आणि स्वच्छ माती या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास पर्यावरणाचे नैसर्गिक संरक्षण होते.
विकासासोबत जबाबदारीही येते, हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून मंत्री मुंडे म्हणाल्या की, औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा गांभीर्याने विचार करूनच पुढील वाटचाल करावी लागेल. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर सुरू होणाऱ्या कृतींचा जागतिक पातळीवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरण संवर्धन हे आर्थिक विकासाला चालना देणारे आहे, हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. कचरा व्यवस्थापनासाठी वैज्ञानिक पद्धती, चक्रीय अर्थव्यवस्था आणि कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती यांवर भर दिला जात असून स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी सक्रिय आहेत. यामुळे ऊर्जा स्वावलंबन साध्य होण्यास मदत होईल, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले.
निसर्ग, वनसंपदा आणि जैवविविधतेचे संरक्षण हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महाराष्ट्राची विस्तीर्ण किनारपट्टी लक्षात घेता सागरी किनारी पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले जात असून नैसर्गिक उपाययोजनांद्वारे हवामान बदलाला सामोरे जाण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण संवर्धनाची संकल्पना स्थानिक पातळीवर रुजून ती जागतिक चळवळ बनावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी मार्गदर्शन, तांत्रिक सहकार्य आणि गुंतवणुकीसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण करण्यावर भर दिला. या उपक्रमातून विश्वासार्ह आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीयोग्य उपायांना चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
जेसन नॉफ म्हणाले की, ज्याप्रमाणे मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याचे धाडसी ध्येय गाठले, तसेच पृथ्वी वाचवण्यासाठी आता मोठ्या आणि आहे. भारताने या उपक्रमात सर्वाधिक विजेते देऊन आपले जागतिक नेतृत्व सिद्ध केले असल्याचे जेसन नॉफ यांनी सांगितले.
यावेळी या स्पर्धेतील अंतिम स्पर्धकाची मुलाखत घेण्यात आली.
0000
नंदकुमार वाघमारे/विसंअ
