
- हळद, मिरची, मसाले प्रक्रिया उद्योगातून लाखांचे उत्पन्न
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील जयश्री जितेंद्र पुनवटकर यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अत्यंत कठीण परिस्थितीतून यशाचा मार्ग शोधला आहे. बारावी (कला) पर्यंत शिक्षण घेतलेल्या जयश्री पुनवटकर यांनी ‘अद्विक गृहउद्योग’ नावाने ‘हळद प्रक्रिया उद्योग’ उभारून केवळ स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही, तर इतरांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

जयश्री पुनवटकर यांचे कुटुंब मजूर वर्गातील होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी कपडे शिवण्याचे काम सुरू केले होते, परंतु त्यातून महिन्याला केवळ ३ ते ४ हजार रुपये उत्पन्न मिळत होते. हा व्यवसाय स्थिर नव्हता आणि नियमित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण होत होते.
कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी नवीन आणि दीर्घकाळ टिकणारा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्धार केला. “स्वतःचा उद्योग सुरू करायचा” हे त्यांचे ध्येय होते. या प्रवासात कुटुंबियांनी त्यांना साथ दिलीच, पण जिल्हाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील तज्ञांनीही मार्गदर्शन केले. विशेषतः राजहंस मॅडम आणि हिरोळकर सर यांच्या प्रशिक्षणामुळे त्यांना योग्य दिशा मिळाली.
पीएमएफएमई योजनेचा लाभ
जयश्री पुनवटकर यांनी आपल्या उद्योगासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेचा लाभ घेतला. या योजनेअंतर्गत त्यांना २ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. यासोबतच त्यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन घेतले, ज्यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य विकसित झाले.
सुरुवातीला त्यांनी ५० किलो मिरच्या खरेदी करून छोट्या प्रमाणात प्रक्रिया उद्योग सुरू केला. या क्षेत्राची पूर्वी कोणतीही माहिती नसल्यामुळे अनेक अडचणी आल्या, परंतु त्यांनी हार मानली नाही. आवश्यक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी हळूहळू व्यवसाय उभा केला. आता त्या उच्च प्रतिचे मिरची पावडर, मसाला, चना, हळद आणि घना पावडरची विक्री करुन व्यवसायात वाढ करत आहेत.
यशाची कहाणी
जयश्री पुनवटकर यांच्या उत्पादनांना बाजारातून चांगला प्रतिसाद मिळू लागला. मागणी वाढली आणि नियमित ऑर्डर मिळू लागल्या. त्यांच्या मेहनतीमुळे आज त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वीच्या तुलनेत उत्पन्न दुप्पट-तिप्पट झाले आहे. याशिवाय त्यांनी इतरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
सामाजिक प्रतिष्ठा
त्यांच्या यशाची दखल गाव पातळीवर घेतली गेली असून त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजात त्यांना मान-सन्मान मिळू लागला आहे.
सध्याची स्थिती व विस्तार
आज जयश्री पुनवटकर यांचा व्यवसाय उत्तम चालू असून त्या सातत्याने प्रगती करत आहेत. बाजारपेठ, प्रदर्शने, पॅम्पलेट व बॅनर यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. सध्या त्यांचे मासिक उत्पन्न ३० ते ४० हजार रुपये असून वार्षिक उत्पन्न लाखोंमध्ये पोहोचले आहे.
प्रेरणादायी संदेश
जयश्री पुनवटकर म्हणतात, “घरातून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला जगाची ओळख होत नाही. कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. शासकीय योजनांचा योग्य वापर केल्यास यश मिळवणे सोपे होते.”
जयश्री पुनवटकर यांची ही यशोगाथा प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आहे. योग्य दिशा, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते आणि यशस्वी उद्योजक बनता येते. हे त्यांनी दाखवून दिले आहे.
