Pune | Mon, 20 April 2026

No Ad Available

सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

Admin | 21 views
सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

मुंबई, दि. २० : आर्थिक वर्ष संपत येत असल्याने, तसेच नवीन वर्षानिमित्त मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना वेग येण्याची शक्यता आणि महसूल वसुलीच्या इष्टांकाची पूर्तता करण्यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे.

महाराष्ट्राचे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या चार सार्वजनिक तसेच साप्ताहिक सुट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये कार्यरत राहतील. या कालावधीत कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी तसेच अभिलेख व चुकविलेले मुद्रांक शुल्क वसुली इत्यादी कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सह जिल्हा निबंधक तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगरसह) कार्यालयेदेखील सुरू राहणार आहेत. संबंधित पक्षकार आणि दस्त नोंदणी करणाऱ्या व्यावसायिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे कार्यालयाचे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) उदयराज चव्हाण यांनी केले आहे.

0000


Join WhatsApp