Pune | Tue, 16 June 2026

No Ad Available

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत राज्यातील ७४१ गावांमध्ये विशेष ग्रामसभा व संयुक्त पडताळणी मोहीम

Admin | 3 views
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत राज्यातील ७४१ गावांमध्ये विशेष ग्रामसभा व संयुक्त पडताळणी मोहीम

मुंबई, दि. १६ : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PM-AJAY) अंतर्गत महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांमधील निवड करण्यात आलेल्या ७४१ गावांमध्ये २३ जून ते २५ जून २०२६ या कालावधीत विशेष ग्रामसभा व संयुक्त पडताळणी मोहीम राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम आयोजित करण्यात येत असून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची जनजागृती, गावांच्या विकासात्मक गरजांची ओळख, ग्राम विकास आराखडे (VDPs) तयार करणे व त्यांना ग्रामसभेची मंजुरी मिळवून देणे ज्या गावांचे ग्राम विकास आराखडे (VDPs) तयार केलेले आहेत, त्या VDPs ना जिल्हास्तरीय समितीची अंतिम मान्यता देणे. ज्या गावांचे गुणांकन ७० किंवा त्यापेक्षा अधिक असेल, त्या गावांना ‘आदर्श ग्राम’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तसेच आदर्श ग्राम म्हणून घोषित झालेल्या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे.

मोहिमेदरम्यान ५० सामाजिक-आर्थिक निर्देशक आणि १५ ग्रामीण पायाभूत सुविधा निकषांच्या पूर्ततेबाबत ग्रामसभांमध्ये सल्लामसलत करण्यात येणार आहे. तसेच गावांच्या विकासासाठी आवश्यक कामांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांपर्यंतच्या निधीची मागणी प्रस्तावित करण्याची कार्यवाहीही करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार निवडलेल्या गावांची संयुक्त पडताळणी (Joint VDP Inspection) करण्यात येणार असून त्याचा तपशील ‘PM-AJAY’ मोबाईल अॅप्लिकेशनवरील Village Inspection Report मध्ये नोंदविण्यात येणार आहे.

या विशेष ग्रामसभा मोहिमेत ग्रामस्थ, अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गटांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ


Join WhatsApp