Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

पोलिसांची कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि बलिदानाला सलाम; पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे पोलीस स्मृती दिनी अभिवादन

Admin | 21 views
पोलिसांची कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि बलिदानाला सलाम; पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे पोलीस स्मृती दिनी अभिवादन

नंदुरबारदिनांक 21 : “कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि बलिदानाला नमन करण्यासाठी आपण आज एकत्र आलो आहोत, देशाच्या सीमा आणि समाजाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या प्रत्येक जवानाला हा दिवस अभिवादनाचा आहे,” अशा शब्दात पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

ते आज जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित पोलीस स्मृती दिन समारंभात बोलत होते. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अप्पर पोलीस अधीक्षक अशीत कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन तहसीलदार प्रमोद पवार, पोलीस अधिकारी, कर्मचारी व शहीद जवानांचे नातेवाईक उपस्थित होते.

 

पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, “या पवित्र दिनामागील इतिहास अतिशय प्रेरणादायी आहे. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमधील ‘हॉट स्प्रिंग्स’ या थंड बर्फाळ प्रदेशात भारताच्या सीमा रक्षक दलाच्या दहा जवानांवर चिनी सैन्याने हल्ला केला. आपल्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी शत्रूशी झुंज दिली आणि देशासाठी बलिदान दिले. त्या तेजस्वी क्षणाची आठवण म्हणून 21 ऑक्टोबर हा दिवस देशभर ‘पोलीस स्मृती दिन’ म्हणून साजरा केला जातो.”

पालकमंत्र्यांनी पुढे सांगितले की, “1 सप्टेंबर 2024 ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत कर्तव्य बजावत असताना एकूण 191 पोलीस अधिकारी व अंमलदार धारातीर्थ पडले आहेत. त्यांच्या कर्तव्यपरायणतेला, त्यागाला आणि देशसेवेला आपण सर्वांनी मनःपूर्वक नमन करावे.” त्यांनी शहिदांच्या कुटुंबियांप्रती राज्य सरकार व जिल्हा प्रशासन सदैव सोबत असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी आवाहन केले की, “पोलीस दल समाजाच्या सुरक्षेचा कणा आहे. सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्थेचे पालन आणि नागरिकांच्या सुरक्षेची हमी देणारे हे दल नेहमी जनतेचा विश्वास जपते. शहिद जवानांच्या प्रेरणेने प्रत्येक पोलीस अधिकारी आपले कर्तव्य अधिक निष्ठेने पार पाडेल, अशी मला खात्री आहे.” समारंभाच्या शेवटी शहिद जवानांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. दोन मिनिटांचे मौन पाळून उपस्थित सर्व अधिकारी व नागरिकांनी त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., यांनी केले. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शिस्त, आदर आणि कृतज्ञतेची भावना संवेदनशीलतेने जाणवत होती.

एका नजरेतून पोलीस स्मृती दिन

  • सर्व पोलीस अधिकारी उपस्थित

कार्यक्रमासाठी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी शिस्तबद्धपणे उपस्थित राहिले.

  • पोलीस अधीक्षकांचे आगमन

पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचे आगमन झाले आणि त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित सर्वांना अभिवादन केले.

  • प्रमुख अतिथींचे आगमन

पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे तसेच अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांचे प्रमुख अतिथी म्हणून आगमन झाले.

  • पालकमंत्रींचे संदेश वाचन

पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त आपला संवेदनशील संदेश वाचून वीर शहीदांना आदरांजली अर्पण केली.

  • परेडचे ‘शोक शस्त्र

परेडने ‘शोक शस्त्र’ करून वीरगती प्राप्त अधिकारी व शिपायांची नावे सन्मानपूर्वक वाचून दाखवली.

  • ‘पुष्पचक्र अर्पण

प्रमुख अतिथी, पोलीस अधीक्षक आणि इतर मान्यवरांनी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.

त्या क्षणी परेडने ‘जनरल सॅल्युट’ दिला.

  • ‘तीन फैरी

शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ परेडने सलामी म्हणून तीन वेळा फैरी झाडल्या.

  • ‘लास्ट पोस्ट आणि ‘राऊंड(Reveille)

बिगुलर्सनी ‘लास्ट पोस्ट’ आणि ‘राऊंड’ या सशस्त्र दलाच्या पारंपरिक ध्वनींची वाजवणूक केली.

  • परेड संचलन समाप्ती अहवाल

परेड कमांडर यांनी प्रमुख अतिथींसमोर परेड संचलन संपल्याचा अहवाल सादर केला.

  • संपूर्ण कार्यक्रमात  भावनिक वातावरण

कार्यक्रम अत्यंत भावनिक शांत, सन्मानपूर्वक आणि शहीद वीरांना अभिवादनाच्या वातावरणात पार पडला.

त्यातून शौर्य, त्याग आणि सेवाभाव यांची जाणीव प्रत्येकाच्या अंतःकरणात दाटून आली.

000


Join WhatsApp