Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

पिकाची पेरणी ते विक्री प्रक्रिया अधिक समन्वयाने होण्यासाठी कृती दलाची स्थापना – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे 

Admin | 19 views
पिकाची पेरणी ते विक्री प्रक्रिया अधिक समन्वयाने होण्यासाठी कृती दलाची स्थापना – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे 

मुंबई, दि. २३ : पिकाची पेरणी ते विक्री ही प्रक्रिया अधिक सुलभ व समन्वयाने होण्यासाठी कृषी, पणन विभागाच्या कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पेरणी ते विक्री पर्यंत मार्गदर्शन मिळाल्याने शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्यास तसेच शेतमालाला भाव  मिळेल असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पणन व कृषी विभागातील प्रकल्प अधिक गतीमान पद्धतीने राबवावेत अशी मागणी या बैठकीत केली.

मंत्रालयात पणन व कृषी विभागातील विविध प्रकल्पांच्या कामाच्या समन्वयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. बैठकीला पणन मंत्री जयकुमार रावल, सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, उपसचिव अ.सा.चंदनशिवे, अवर सचिव (पणन) अस्मिता पाटील, महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे सहव्यवस्थापक विनायक कोकाटे, दूरदृश्यप्रणालीद्वारे स्मार्ट प्रकल्पाचे संचालक हेमंत वसेकर, संचालक (विस्तार) रफीक नायकवडी, महाराष्ट्र राज्य वखार मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे, कृषी संचालक सुनिल बोरकर यासह कृषी विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री श्री. भरणे म्हणाले की, पिकाची पेरणी ते प्रत्यक्ष  उत्पादन अधिक होण्यासाठी कृषी विभाग विविध उपाययोजना करत असते. शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची पेरणी करावी जेणेकरून पिकाला विक्रीपश्चात अधिक भाव मिळेल. हवामान अंदाज, शेतमालाची विक्री हे सर्व मार्गदर्शन करावे यासाठी  पीक काढणी मार्गदर्शक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात  येईल. पणन व कृषी विभागातील अधिकारी यांनी समन्वयातून काम करावे. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत भागीदारीतून उभारण्यात येणारी गोदामांची कामे करणे, समुदाय आधारित संस्थांना भागीदारी माध्यमातनू विकेंद्रीत गोदाम उभारणे तसेच समृद्धी महामार्ग -ॲग्रो लॉजिस्टीक पार्क उभारण्यासंदर्भात कृषी विभाग सर्वोतोपरी सहकार्य करेल असे कृषिमंत्री श्री. भरणे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी मागणी आधारित पीक घेण्याबाबत मार्गदर्शन आवश्यक – पणन मंत्री जयकुमार रावल

पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, शेतकऱ्यांना शेतीमध्ये कोणते पीक घेतले तर योग्य फायदा मिळेल यासाठी कृषी व पणन विभागाकडून योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत  ४ शेतकरी उत्पादक संस्था यांच्याबरोबर विकेंद्रित गोदामांची कामे लवकर पूर्ण करावीत. तसेच २२ जिल्ह्यात ३५ तालुक्याच्या ठिकाणी गोदाम उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या कामालाही कृषी विभागाने गती द्यावी. तसेच पिकाची पेरणी ते विक्री ही प्रक्रिया अधिक सुलभ व समन्वयाने होण्यासाठी पणन व कृषी विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. यासाठी कृति दलाची बैठक दोन महिन्यातून एकदा घेण्यात यावी. शेतकऱ्यांना पेरणी ते शेतमालाची विक्री पर्यंत मार्गदर्शन वेळेत मिळावे यासाठी दोन्ही विभागातील अधिकारी मार्गदर्शन करतील. तसेच पिकांची निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेला ‘पेपर हिट ट्रिटमेंट’ प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी कृषी विभागाचे सहकार्य लागेल असेही त्यांनी सांगितले.

000

संध्या गरवारे/विसंअ/


Join WhatsApp