Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी 

Admin | 31 views
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी 

परभणी, दि. 26 (जिमाका) – अलीकडील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा आज जाणून घेतल्या. रामपुरी, थार, हटकरवाडी, ब्रम्हपुरी, साळापुरी, धारासुर, सायळा या गावांमध्ये भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यास शासन कटिबद्ध आहे.  निकषात बदल करुन शेतकऱ्यांना अधिकची मदत कशी मिळेल, यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.

ओसाड पडलेली शेती, वाया गेलेली पीके आणि हतबल झालेले शेतकरी पाहून पालकमंत्र्यांच्या डोळ्यांतही पाणी दाटले. “या संकटात तुम्ही एकटे नाही, शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. बाधित शेतकऱ्याला सर्वोतोपरी मदत केली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.  शेतकऱ्यांच्या घामाची किंमत शासनाला ठाऊक आहे, त्यांची मेहनत वाया जाऊ दिली जाणार नाही, असे आश्वासन देऊन पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे पूर्ण करुन शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

पाहणी दरम्यान, मानवत तालुक्यातील रामपुरी या गावातील गोदावरी नदीच्या पुरामुळे  मच्छीमारांच्या  जाळ्यांचे झालेले नुकसान तसेच शेतीमध्ये साचलेल्या गाळाची नोंद पंचनाम्यात घ्यावी, अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करुन रामपुरी आणि थार या गावात गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने यावर कायमस्वरूपी उपयोजना करावी. थार व वांगी या गावातील शेतकऱ्यांनी कॅनॉल मार्गे रस्ता व नदीच्या पुलाची उंची वाढवण्याच्या केलेल्या मागणीवर पालकमंत्री  यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या आणि कॅनॉलच्या उंची वाढवण्याचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना केली. तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सौम्यकरणाचा  प्रस्ताव मंजूर झाला असून त्याचे टेंडर प्रक्रिया लवरच पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

नदीकाठच्या शेतांचं  मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त  मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. तसेच नदी काठच्या शेत पिकांचे  होणाऱे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले. साळापुरी येथे बोलताना पालकमंत्री म्हणाल्या की, परभणी जिल्ह्यातील सर्व 52 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद घेतली आहे,  त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये.

गंगाखेड तालुक्यातील सायाळा या गावांच्या शिवारात गोदावरी व इंद्रायणी नदीच्या बॅकवॉटरमुळे  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षी होणाऱ्या या नुकसानीची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.

सायाळा या गावातील पुलाची उंची वाढवण्याचे व धसाडी येथील पानंद रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली असता शेतकऱ्यांच्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाईल व त्यानुसार तातडीने उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

यावेळी पाथरीच्या उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, परभणीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार, संबंधित अधिकारी कर्मचारी, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***

 


Join WhatsApp