
परभणी, दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेत पिकांचे नुकसान झाले आहे. याची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी व महिलांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना धीर दिला. या संकटकाळात राज्यशासन नुकसानग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

सेलू तालुक्यातील रोहिणा (का), राजवाडी, जिंतूर तालुक्यातील कसर, दुधगाव, आसेगाव येथील शिवारात आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्वत: थेट बांधावर जात पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, सेलू व जिंतूर तालुक्याचे तहसीलदार, महसूल, कृषि, पशुसंवर्धन आदीसह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाल्या की, परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वांनाच शासनाकडून मदत दिली जाणार आहे. नुकतीच शासनाने जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता 128 कोटी 55 लक्ष 38 हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली असून निधीच्या वाटपाची कार्यवाही सुरु आहे. चालू सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईदेखील तातडीने दिली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करु नये. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, शासन आपल्या सोबत आहे, असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

पालकमंत्री यांनी कसर येथील करपरा नदीची देखील पाहणी केली. भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. याची दखल घेऊन पालकमंत्री यांनी शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही देऊन शेतकऱ्यांनी खचू नये. शासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले. यावेळी शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००
