
मुंबई, दि. १६ : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही आता एक लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन फलोत्पादन, रोजगार हमी योजना आणि खार जमीन विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशभर राबविण्यात आलेल्या ‘संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम) २०२५-२६’ या महाराष्ट्र राज्यस्तरीय अभियानाचा सांगता समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री गोगावले म्हणाले की, वाढते प्रदूषण ही जागतिक समस्या असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नैसर्गिक आणि हरित इंधनाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने इंधन बचतीचे कर्तव्य पार पाडावे.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा पुढाकार
१ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानाचे मुख्य घोषवाक्य ‘तेल आणि वायू वाचवा, हरित ऊर्जेचा स्वीकार करा’ असे होते. जनसामान्यांमध्ये इंधन बचतीचा संदेश पोहोचवणे, परकीय चलनाची बचत करणे आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करून निसर्गाचे रक्षण करणे. या अभियानात बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसी आणि गेल इंडिया यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घेतला.
विविध उपक्रमांनी गाजला महोत्सव
गेल्या १५ दिवसांत राज्यात विविध स्तरांवर प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये सायकल रॅली, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, आणि वाहनचालकांसाठी विशेष तांत्रिक कार्यशाळांचा समावेश होता. या अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि गृहिणींपर्यंत इंधन बचतीचे तंत्र पोहोचवण्यात आले.
यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते अभियानातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान चिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मुख्य प्रबंधक दीपक वाघ यांनी मानले. या सोहळ्याला बीपीसीएलचे थॉमस जेम्स, एचपीसीएलचे मुकुंद जवंजल, आयओसीएलचे संतोष दैत, गेल इंडियाचे मोहम्मद शफी, मुख्य प्रबंधक दीपक वाघ, वरिष्ठ प्रबंधक रितेश जाधव यांसह तेल कंपन्यांचे अधिकारी, इंधन वितरक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००
संध्या गरवारे/विसंअ
