Pune | Sun, 07 June 2026

No Ad Available

नवीन शैक्षणिक धोरणात भावनात्मक विकासालाही प्राधान्य – मनशक्ती प्रयोग केंद्राचे प्रमोद शिंदे

Admin | 12 views
नवीन शैक्षणिक धोरणात भावनात्मक विकासालाही प्राधान्य – मनशक्ती प्रयोग केंद्राचे प्रमोद शिंदे

मुंबई, दि. ४ : नवीन शैक्षणिक धोरणात मुलांच्या बुद्ध्यांकाबरोबरच त्यांच्या भावनात्मक विकासालाही महत्त्व देण्यात आले आहे. ज्ञान, परीक्षण, तर्क, विचार, हिशोब आणि जाणीव यासोबतच प्रेम, जिव्हाळा, क्षमा, विश्वास, आपुलकी, हितकारक वृत्ती आणि कृतज्ञता यासारख्या मूल्यांचा शिक्षणातून विकास करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मनशक्ती प्रयोगकेंद्राचे प्रमोद शिंदे यांनी सांगितले.

मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगण येथे सामान्य प्रशासन विभागामार्फत ‘टेक वारी – २.०’ या तंत्रस्नेही उपक्रमांतर्गत मूल्याधिष्ठित क्षमतावृद्धी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बालकांच्या अभ्यास पद्धतीच्या वृद्धीविषयी मार्गदर्शन करताना प्रमोद शिंदे बोलत होते.

प्रमोद शिंदे यांनी सांगितले की, मुलांच्या सवयींपैकी ५० टक्के घटक हे जनुकांवर अवलंबून असतात, तर उर्वरित ५० टक्के विकास हा पालकांच्या संगोपनावर अवलंबून असतो. सध्याच्या तंत्रज्ञानप्रधान युगात मुले सतत डिजिटल माध्यमांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य संस्कार आणि मूल्यांचे शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. मन सकारात्मक आणि संतुलित राहिल्यास स्वभाव चांगला घडतो, बुद्धी संतुलित राहिल्यास मेंदूचे कार्य प्रभावी होते आणि योग्य आहारामुळे आरोग्य सुदृढ राहते. या सर्वांचा थेट परिणाम मुलांच्या अभ्यासावर आणि एकूणच व्यक्तिमत्त्वावर होतो. मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडा, कला, देशप्रेम, कृतज्ञता, चांगले वर्तन, दूरदृष्टी, व्यवहारज्ञान, शांतताप्रियता, निर्भयता, नेतृत्वगुण आणि परीक्षेतील यश या घटकांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुलांचे वर्तन मेंदू ठरवितो, मेंदूची कार्यप्रणाली जनुकांवर आधारित असते आणि जनुकांची अभिव्यक्ती वातावरणीय घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे मुलांमध्ये सकारात्मक विचार आणि चांगले वातावरण निर्माण करणे हे उत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

००००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

 

 


Join WhatsApp