Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

मुख्य माहिती आयुक्त राहूल पांडे जेव्हा ‘लोकराज्य’च्या ऐतिहासिक आठवणीला उजाळा देतात

Admin | 15 views
मुख्य माहिती आयुक्त राहूल पांडे जेव्हा ‘लोकराज्य’च्या ऐतिहासिक आठवणीला उजाळा देतात

नागपूर, दि. 11 : महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत माहिती पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम लोकराज्यने केले आहे. शासनाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय हे कायद्याच्या स्वरुपात प्रशासनातून सर्वसामान्य जनतेला प्रत्ययास येतात. माहिती प्रसारासमवेत प्रशासनाप्रती विश्वासार्हता निर्माण करण्याचे कार्य लोकराज्य या शासकीय मासिकाने केले आहे. गत पाच दशकांपेक्षा अधिक कालावधीपासून जपून ठेवलेले हे अंक कायदेविषयक साक्षरतेच्या दृष्टीनेही तेवढेच महत्वाचे आहेत. प्रत्येक दशकात प्रशासकीय पातळीवर झालेल्या बदलांचे टप्पे दाखविणारे दस्ताऐवज म्हणून आपण पाहिले पाहिजे, असे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहूल पांडे यांनी सांगत लोकराज्यच्या जुन्या विशेषांकाबाबत उजाळा दिला.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त विधानभवन येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जुन्या दुर्मिळ लोकराज्य अंकांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनास मुख्य राज्य माहिती आयुक्त राहूल पांडे व नागपूर खंडपीठ राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव, मेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे यांनी आज भेट दिली.  जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

महाराष्ट्रातील लोकप्रशासन, महाराष्ट्र शासनाने घेतलेले महत्वपूर्ण विविध धोरणात्मक निर्णय याबद्दल संपूर्ण भारतात आकर्षण आहे. महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये, जडणघडणीमध्ये कालपरत्वे झालेल्या विविध निर्णयांची माहिती लोकराज्यच्या अंकामध्ये वेळोवेळी घेण्यात आलेली आहे. ही जडणघडण व यातील पाऊलखुणा असा मोठा दस्ताऐवज आता प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जगातील प्रत्येक व्यक्तीला एका क्लिकवर डिजीटल पध्दतीने उपलब्ध करण्याबाबत माहिती व जनसंपर्क विभाग नियोजन करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

‘महाराष्ट्रातील एका काळाला अधोरेखित करणारे हे प्रदर्शन आहे. हे केवळ विधानसभा परिसरापूरते मर्यादित न रहाता शहरातही महत्वाच्या ठिकाणी लावण्यात आले पाहिजे,’ अशी मौलिक सूचना नागपूर खंडपीठ राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव यांनी केली. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकराज्यच्या अंकातील माहिती ही मार्गदर्शक ठरत आली आहे. यापूढेही लोकराज्यचा अंक माहिती साक्षरतेसह विद्यार्थ्यांचाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगटीवार, आमदार भिमराव तपकीर यांनी प्रदर्शनीला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शनात 1964 पासूनचे  दुर्मिळ लोकराज्य विशेषांक पाहण्यास उपलब्ध आहेत. यात महत्वाचे ज्ञानेश्वरी शताब्दी, महात्मा ज्योतिबा फुले स्मृती शताब्दी, शाहू महाराज राजरोहन, बाळशास्त्री जांभेकर, बालगंधर्व, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मराठी भाषा विषयक, कोकण, विदर्भ, आदिवासी विशेषांक, तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, संत परंपरा विषयक, महाराष्ट्रातील उत्सव इत्यादी विषयावरील जवळपास दीडशे  लोकराज्याचे अंक उपलब्ध आहेत.

                                                            ********


Join WhatsApp