Pune | Sat, 14 February 2026

No Ad Available

मिहान प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाचे काम पूर्णत्वास – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Admin | 5 views
मिहान प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाचे काम पूर्णत्वास – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर,दि. 13 : मिहान प्रकल्पाअंतर्गत खापरी (रे.) तेल्हारा, दहेगाव व कलकुही गावातील प्रकल्पग्रस्तांना सुमारे 781 कोटी एवढा निधी वाटप केलेला आहे. जितक्या अधिक प्रमाणात प्रकल्पग्रस्तांना न्याय देता येईल तो देण्याची भूमिका आपण घेतली. अनेकांना चांगल्या ठिकाणी प्लाटचे वाटप केले. लाभाच्या स्वरुपात निधी दिला. महसूल विभागामार्फत युद्ध पातळीवर ही सर्व प्रक्रिया पार पाडून पुनर्वसनाचे काम पुर्णत्वास आले आहे. या उपरही एखाद्या व्यक्तीला जर आपल्यावर अन्याय झाल्याची भावना असेल अथवा त्यांच्याकडे रीतसर आवश्यक ती कागदपत्रे असतील अशा लोकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबीर घेऊन एका महिन्यात सर्व विषय मार्गी लावण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुनर्वसन विभागाला दिले.

मिहान येथे आज पुनर्वसन व इतर प्रलंबित विषयाबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी तथा मिहानचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. विपीन इटनकर, मिहानचे सल्लागार सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मलिक विराणी, वरिष्ठ व्यवस्थापक गौरव उपश्याम व विविध पदाधिकारी, पुनर्वसन प्रकल्पांतर्गत बाधित लोकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मिहान प्रकल्पांच्या भूसंपादन व पुनर्वसनासाठी 3 हजार 994 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. यापैकी बहुतांश निधी मिळाला आहे व त्याचे पुनर्वसनाच्या कामासाठी वाटप झालेले आहे. उर्वरित निधीपैकी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यापैकी शासनाने 240 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. 160 कोटी रुपयांची मागणी नोंदविण्यात आली असून पुढील आर्थिक वर्षासाठी 597 कोटी रुपयांची मागणीही नोंदविण्यात आली आहे. शासनाकडून हा निधी महत्प्रयासाने हा निधी मिळविला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी याबाबत आढावा घेतलेला आहे. या निधीतून वाढीव मोबदला प्रकरणे, पुनर्वसन अनुदाने, भूसंपादन, पुनर्वसन भागात नागरी सुविधा आदी कामांवर भर दिला असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

पुनर्वसन भागात लोकांची श्रद्धास्थानाविषयी असलेली मागणी लक्षात घेऊन नियमाप्रमाणे मंदिर, विहार आदीबाबत निर्णय घेतला जाईल. यात अधिकाधिक तीन हजार चौ.फूट एवढी जागा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांना निर्देश दिले. पुनर्वसन भागात मिहानअंतर्गत नागरी सुविधा देण्याचा आपण प्रयत्न केला. ग्राम पंचायतीमार्फत या गावांतील पाणी पट्टीची रक्कम भरण्याबाबत जो बेजबाबदारपणा आहे त्याबद्दल ग्रामविस्तार अधिकारी व तेथील ग्रामसेवकाला त्यांनी खडे बोल सुनावले. यापूर्वी नागरिकांना पाणीपट्टी सुसह्य व्हावी  यासाठी अभय योजना देऊनही प्रतिसाद न मिळाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ग्राम पंचायत यांनी नळपट्टी, घरपट्टी वसुलीतून आपले हक्काचे आर्थिक स्त्रोत बळकट करणे आवश्यक आहे. यातूनच विकासाला दिशा मिळते असे त्यांनी सांगितले.

*** 

  


Join WhatsApp