Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

महसूल यंत्रणेने आपल्या क्षमतेचा वापर करुन गरजूंना कमीत कमी वेळेत न्याय मिळवून द्यावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Admin | 24 views
महसूल यंत्रणेने आपल्या क्षमतेचा वापर करुन गरजूंना कमीत कमी वेळेत न्याय मिळवून द्यावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ११ : राज्य शासन पारदर्शकतेने आणि गतिमानतेने लोकाभिमुख काम करीत आहे. महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडित असून या विभागातील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. या क्षमतेचा वापर गरजूंना कमीत कमी वेळेत न्याय देण्यासाठी करून शासनाच्या धोरणाला पूरक कार्य करावे, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत कोकण महसूल विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, विभागातील आमदार सर्वश्री दीपक केसरकर, निलेश राणे, विक्रांत पाटील, किरण सामंत, भास्कर जाधव, अबु आझमी, भाई जगताप, राजन नाईक, अनंत नर, मुरजी पटेल, हरून खान, तुकाराम काते, श्रीमती मनिषा चौधरी, चित्रा वाघ, विद्या ठाकूर, सुलभा गायकवाड यांच्यासह विभागातील जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याची क्षमता आहे. कोकण विभागाचे आतापर्यंतचे काम समाधानकारक असून अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये प्रलंबित असलेल्या सुनावण्या येत्या तीन महिन्यात निकाली काढण्यात याव्यात. त्याचबरोबर विभागात सुरू असलेली नावीन्यपूर्ण कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यात यावीत. यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करावा. कामाची गती राखताना अनवधानाने एखादी चूक झाली तर चालेल तथापि जाणीवपूर्वक झालेली चूक खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

वाळूबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. तथापि कोकणातील भौगोलिक परिस्थिती पाहता या विभागासाठी धोरणात बदल करावा लागणार असल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून १५ दिवसात याबाबतची कार्यप्रणाली सादर करावी, असे निर्देश मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत वाळू चोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा सप्ताह’ राबविण्यात येणार आहे, या दरम्यान मोहीम स्वरूपात पाणंद रस्ते आणि सर्वांसाठी घरे अभियानास पूरक उपक्रम राबविले जाणार आहेत. या पंधरवड्यात महसूल यंत्रणेने सर्व लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे, असे निर्देशही मंत्री श्री बावनकुळे यांनी दिले.

याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सादरीकरणाद्वारे कोकण विभागातील महसुली कामाच्या सद्यस्थितीचा आढावा सादर केला. त्याचबरोबर सेवा पंधरवड्यादरम्यान करण्यात येणाऱ्या पाणंद रस्ते आणि सर्वांसाठी घरे अभियानाच्या तयारीबाबत तसेच विविध जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबतची माहिती दिली. सामाजिक साहाय्याच्या लाभाच्या योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी महसूलमंत्र्यांना दिली.

कोकण विभागातील देवस्थान इनाम जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी धोरण ठरविण्याबाबत विभागीय आयुक्तांनी प्रारूप तयार करण्याच्या सूचना मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिल्या. त्याचबरोबर कोकणातील महसूल विभागांतर्गत रिक्त पदे भरण्यासाठीची कार्यवाही तातडीने करावी, कोळीवाड्यांचे सर्वेक्षण करून त्यांना मालमत्ता पत्र देण्याबाबत कार्यवाही करावी, अकृषीक कर आणि सनद रद्द करण्याबाबत मुंबई आणि उपनगर जिल्ह्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवावा, कृत्रिम वाळूसाठी शासनाच्या निकषाप्रमाणे वाळू तयार करण्यास इच्छुक असणाऱ्या सर्वांना परवाने देण्यात यावेत, असे निर्देशही मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.

यावेळी मंत्री श्री.बावनकुळे यांनी उपस्थित आमदारांच्या सूचना विचारात घेऊन सर्व जिल्हाधिकारी तसेच प्रांत अधिकारी यांच्याकडून त्याबाबतच्या कामाचा आढावा घेतला. जी कामे प्रलंबित आहेत ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

 


Join WhatsApp