
परभणी, दि. १७ (जिमाका): ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील धार येथे झाला. त्या निमित्ताने अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

कुटुंबातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर संपूर्ण कुटुंब आनंदी राहते, त्यामुळे महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. नियमितपणे आरोग्य तपासणी करुन महिलांनी निरोगी राहावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला “स्वस्थ नारी सशक्त परिवार” या राष्ट्रीय अभियानाच्या शुभारंभाचे थेट प्रक्षेपण दूरदृष्यप्रणालीद्वारे यावेळी करण्यात आले होते.

पालकमंत्री म्हणाल्या की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक लोककल्याणकारी योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ नागरिकांनी अवश्य घ्यावा. “स्वस्थ नारी सशक्त परिवार” या राष्ट्रस्तरीय अभियानाचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला आहे. दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात प्रामुख्याने महिला, मुली व बालकांचे आरोग्य तपासणी व त्यांना आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरामधून संसर्गजन्य आजार व असंसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराचे आयोजन ग्रामीण व शहरी रुग्णालय, महानगरपालिका रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी विशेष तज्ञांच्या मार्फत करण्यात येणार आहे, या शिबीराचा महिलांनी अवश्य लाभ घ्यावा.

आशासेविकांच्या कामाचे कौतुक करताना पालकमंत्री म्हणाल्या की, आशाताईंमुळेच गावाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्या निस्वार्थ भावनेने काम करतात. आरोग्य राज्यमंत्री या नात्याने त्यांच्या अडचणी निश्चितपणे सोडविल्या जातील. आपल्या परभणी जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जाईल. मधुमेहामुळे होणारे मृत्यु टाळण्यासाठी मधुमेही रुग्णांना आशा स्वयंसेविकामार्फत घरपोच औषधी किट दिली जात आहे. जिल्ह्यात 16 हजारांपेक्षा जास्त किटचे वाटप करण्यात आले आहे. आपल्या महाराष्ट्राला टीबी मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, यासाठी आपणा सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले.
डॉ. लखमावार यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी “स्वस्थ नारी सशक्त परिवार” या अभियानाबद्दल माहिती देऊन या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. मोडक यांनी केले. कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, आशासेविका व महिला उपस्थित होत्या.
०००
