
सिंधुदुर्गनगरी, दि. १७ (जिमाका) : महिलांच्या आरोग्याचे रक्षण झाले तरच कुटुंबाचे व समाजाचे आरोग्य सुदृढ राहते. महिलांना वेळोवेळी तपासणी, योग्य उपचार आणि आरोग्याबाबत जागरूकता मिळाली तर सशक्त समाज उभारता येतो. त्यामुळे महिलांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या अभियानांतर्गत महिलांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून तपासणीनंतर पुढील आवश्यक उपचारांची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी शासन व प्रशासनाचा हा उपक्रम महत्वाचा ठरेल, असेही पालकमंत्री राणे यांनी सांगितले.

यावेळी निक्षय मित्र रोटरी क्लब तर्फे क्षय रुग्णांना फूड बास्केटचे देखील वाटप करण्यात आले. अभियानादरम्यान महिलांच्या हिमोग्लोबिन तपासण्या, स्त्रीरोग तपासण्या, सर्वसाधारण आरोग्य तपासण्या, रक्तदाब व मधुमेह तपासण्या करण्यात येणार असून महिलांना मोफत सल्ला व मार्गदर्शनही दिले जाणार आहे.

पालकमंत्री राणे म्हणाले, महिलांचे आरोग्य चांगले असेल तरच कुटुंब निरोगी राहील. त्यामुळे या अभियानातून मिळणाऱ्या आरोग्यसेवेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा. प्रशासनाने देखील या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून महिलांच्या आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी संवेदनशीलतेने काम करावे. या अभियानामुळे जिल्ह्यातील महिलांना एकाच ठिकाणी तपासणीसह पुढील उपचार सुविधा मिळणार असल्याने त्याचा मोठा फायदा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्कृष्टपणे देशाचे नेतृत्व करत आहेत. समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांनी मिळवलेला लौकिक यापासून प्रेरणा घेऊन सिंधुदुर्गात महिलांच्या आरोग्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे पंधरादिवसीय आरोग्य अभियान सुरू करण्यात आले असून, महिला रुग्णांना अधिकाधिक आरोग्यसेवा देण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.

पालकमंत्री राणे पुढे म्हणाले की, सिंधुदुर्गात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महिलांना चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविल्यास जिल्ह्याचा विकास आणखी गतीमान आणि सुखकर होईल. या उपक्रमात रोटरी क्लबनेही मोलाचा हातभार लावला आहे. तसेच डॉ. विद्याधर तायशेटे यांच्यासारखे समाजपरिवर्तन घडविण्यासाठी काम करणारे व्यक्तिमत्व या शिबिराच्या कामकाजात सहभागी झाले आहेत, ही समाधानाची बाब आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या या शिबिराचा पहिला दिवस यशस्वीरीत्या पार पडला असून, उर्वरित १४ दिवसांत अधिकाधिक महिला रुग्णांनी लाभ घ्यावा, यासाठी सुयोग्य नियोजन करण्याचे आवाहन पालकमंत्री राणे यांनी केले.
डॉ. श्रीपाद पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, ‘स्वस्थ नारी सशक्त महिला अभियान’ 2 ऑक्टोबर पर्यंत राबवले जाणार आहे. या शिबिरांतर्गत कॅन्सर, मधुमेह, मानसिक आजारांसह विविध रोगांची तपासणी व उपचार करण्यात येत आहेत. महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती सोबतच अवयवदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली असून, रक्तदान शिबिरही पार पडले आहे. प्रत्येक शासकीय रुग्णालयात हे शिबिर आयोजित करण्यात आले असून सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी यावेळी केले.
या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, पीएम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत यांच्यासह कणकवली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, डॉ. विद्याधर तायशेटे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
०००
