Pune | Thu, 16 April 2026

No Ad Available

महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती उत्सव उत्साहात

Admin | 9 views
महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती उत्सव उत्साहात

यवतमाळ, दि. १३ (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांचा द्विशताब्दी जयंती उत्सव मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त प्राजक्ता इंगळे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मून उपस्थित होत्या.

पालकमंत्री राठोड यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने सुरु असलेल्या राज्य शासनाच्या उपक्रम व विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. विशेषतः महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सुधारणा करून २३९९ आजारांवर उपचाराचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन केले तसेच बालविवाह प्रतिबंधाची प्रतिज्ञा उपस्थितांकडून करून घेतली.

कार्यक्रमात प्रा. प्रवीण देशमुख व अडसूळ यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना व पालकांना महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा दिली.

श्रीमती मून यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांच्या आधारे योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, तसेच परराज्य शिष्यवृत्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आदींचे लाभ वितरित करण्यात आले. यासोबतच, समाजभूषण व्यक्तींचा सन्मान संविधानाची उद्देशिका देऊन करण्यात आला. अनुसूचित जातीतील बचतगटांना मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत साधनांचे वाटपही करण्यात आले.

ज्योत्स्ना तिजारे यांनी आभार मानले. रुपेश वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

०००


Join WhatsApp