
मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्यांचा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या सहकार्याने सादर करण्यात आला.
यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राजस्थान व ओडिशा राज्यांच्या लोकगीत व नृत्याला राज्यपालांनी शाबासकी दिली. विद्यार्थ्यांनी राजस्थानचे चरी नृत्य ‘केसरीचा बालमा’ या गीतासह सादर केले तसेच ओडिशाचे संबलपुरी ढलकाई नृत्य लोकगीतासह सादर केले.

भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिवस लोकभवन येथे आयोजित करण्यात आला होता.

भारतातील प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा, नृत्य व खाद्य संस्कृती वेगळी आहे. ही विविधता हीच देशाची शक्ती आहे. संपूर्ण देश फुलांच्या हाराप्रमाणे एका सांस्कृतिक धाग्याने बांधला आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमामुळे प्रत्येक राज्याला इतर राज्यांची संस्कृती समजण्यास मदत होते, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध भारत असे नसून ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा विकसित भारत या संकल्पनेमागील विचार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. शासन आणि समाजाने खांद्याला खांदा लावून काम केल्यास विकसित भारत निश्चितपणे साकार होईल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी दोन्ही राज्यांचे सौंदर्य, इतिहास, वारसा, स्वातंत्र्यलढा, संस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शविणारे माहितीपट दाखवण्यात आले. यावेळी ‘म्हारो राजस्थान’ हे राजस्थानचे व ‘बंदे उत्कल जननी’ हे ओडिशाचे राज्यगीत ऐकविण्यात आले.
कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरोडकर, समितीचे सदस्य, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) डॉ.अविनाश ढाकणे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व पालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर उपस्थित होते.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (प्रशासन) करुणा वावडणकर यांनी आभार प्रदर्शन केले.
००००
