
मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाच्या (मॅग्नेट) राज्यातील प्रगतीबाबत आशियाई विकास बॅंकेच्या (एडीबी) वरिष्ठ अधिकाऱ्यांना आश्वस्त करताना या प्रकल्पाच्या अंमलबजावणीद्वारे राज्यात गुंतवणूक आणि रोजगारवाढीस चालना मिळाली असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत मॅग्नेट प्रकल्पाच्या कामकाजासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांच्यासह आशियाई विकास बॅंकेच्या संचालक (भारत) श्रीमती मिओ ओका, ताकेशी उडेओ, क्रिशन रौटेला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

एकात्मिक मूल्य साखळीचा विकास मॅग्नेट प्रकल्पामार्फत
आशियाई विकास बॅंक आणि पणन विभागामार्फत अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख १४ फळपिके (डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी व मिरची (हिरवी व लाल), आंबा, काजू, लिंबू, पडवळ) आणि सर्व प्रकारची फुले अशा एकूण १५ फलोत्पादन पिकांसाठी उत्पादन ते ग्राहकांपर्यंत वितरण अशा एकात्मिक मूल्य साखळीचा विकास मॅग्नेट प्रकल्पामार्फत करण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी उत्पादक संस्था (FPOs), निर्यातदार, प्रक्रियादार, संघटीत किरकोळ विक्रेते, कृषी व्यवसाय करणारे लघु व मध्यम उद्योजक, वित्तीय संस्था, स्वयंसहाय्यता समूह यांचा सहभाग आहे.
‘एडीबी’मार्फत कर्ज आणि खेळते भांडवल
राज्यातील १४ फलोत्पादन पिकांच्या व फुलांच्या मूल्यसाखळीमध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे व त्यांची साठवणूक क्षमता वाढविणे, मागणीनुसार मालाची मूल्यवृद्धी करणे आणि वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे, शेतकरी उत्पादक संस्थांचा मूल्यसाखळीतील सहभाग वाढविणे ही मॅग्नेट प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ‘एडीबी’मार्फत उत्पादक आणि उद्योजकांना नवीन व संघटीत बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक ते तांत्रिक साहाय्य, पायाभूत सुविधा उभारणीसाठी साहाय्य, मध्यम मुदत कर्ज आणि खेळते भांडवल पुरविण्यात येत आहे.
या बैठकीमध्ये प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर चर्चा करण्यात आली. मॅग्नेट प्रकल्पाचा वित्तीय आराखडा १४२.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका असून, प्रकल्पाचा अंमलबजावणी कालावधी सन २०२१-२२ ते २०२७-२८ असा आहे. या प्रकल्पाचा विस्तारीत टप्पा असलेल्या मॅग्नेट २.० बाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली.
मॅग्नेट २.० प्रकल्पाचा सविस्तर आराखडा
राज्यातील कृषिमालास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याकरिता उत्तम कृषी तंत्रज्ञान, कृषिमालाची हाताळणी, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, ब्रँडींग, समृद्धी महामार्गावरील कॉरीडॉर फलोत्पादन मूल्य साखळीचा समावेश, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संस्थात्मक बळकटीकरण, कार्बन क्रेडीट आदी बाबींचा समावेश असलेल्या मॅग्नेट २.० प्रकल्पाचा सविस्तर आराखडा आशियाई विकास बॅंकेच्या माध्यमातून व सहकार्याने तयार करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
00000
बी.सी.झंवर/विसंअ/
