
मुंबई, दि. १७: मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येतील, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदरातील आणि मत्स्यमारांच्या विविध समस्यांबाबत आढावा बैठक झाली. बैठकीस राज्यमंत्री आशिष जयस्वाल खासदार हेमंत सावरा, आमदार मनीषा चौधरी, आमदार राजेंद्र गावित, सचिव रामास्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदरातील आणि मत्स्यमारांच्या विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये पालघर येथे मत्स्य विद्यालय सुरू करण्याबाबत जिल्हास्तरीय होलसेल मच्छी मार्केट सुरू करणे, तसेच मच्छीमारांच्या सुरक्षितता व कल्याणासाठी विमा योजना प्रभावीपणे राबविणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.
सातपाटी मच्छीमार बंदरातील विकासकामे, धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची गरज, तसेच नियंत्रित मासेमारी व मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना या विषयांवरही यावेळी चर्चा झाली. राज्यात अलीकडे वादळे आणि अवकाळी पावसामुळे मच्छीमारांच्या नौकांसह मासळीचे झालेले नुकसान याबाबतही आढावा घेण्यात आला. तसेच सरंगा माशाला राज्य मासा दर्जा देण्यासंदर्भात पुढील कार्यवाही, पावसाळी मासेमारी बंदी कालावधी, एलईडी व अनियमित मासेमारीवर नियंत्रण, तसेच मत्स्य कल्याणकारी महामंडळाच्या कार्यप्रणालीतील सुधारणा यावरही चर्चा केली.
पेंच जलाशय महाराष्ट्र मत्स्यउद्योग विकास महामंडळाकडून मत्स्य व्यवसाय विभागाकडे वर्ग करण्यासंदर्भातही चर्चा झाली.
000000
मोहिनी राणे/स.सं
