
यवतमाळ जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाची एक सकारात्मक आणि प्रेरणादायी चळवळ उभी राहताना दिसत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांनी महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला जात आहे. आर्थिक स्वावलंबन, संघटनशक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे महिलांनी विकासाच्या नव्या उंची गाठण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ४२१ गावांमध्ये स्वयं सहाय्य महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध विकासात्मक उपक्रम राबवले जात असून ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण विकास महिला उद्यम विकास प्रकल्प’ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून तब्बल ६,८७६ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. या गटांमध्ये ७६,९६४ महिला एकत्र येऊन संघटित शक्ती निर्माण करत आहेत. या माध्यमातून महिलांमध्ये बचतीची सवय, आर्थिक नियोजन आणि निर्णयक्षमता विकसित होत आहे.

१८ हजार महिला ‘लखपती दीदी’
महिलांच्या आर्थिक प्रगतीत बँकिंग क्षेत्राचीही महत्त्वाची भूमिका आहे. महिला बचत गटांना दरवर्षी सुमारे १२० कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध होत असून त्याची ९९ टक्के परतफेड होते. ही बाब महिलांच्या प्रामाणिकपणा, शिस्तबद्धता आणि आर्थिक जबाबदारीची जाणीव दर्शवते. या आर्थिक पाठबळामुळे अनेक महिलांनी स्वतःचे उद्योग उभारले असून त्या स्वावलंबी बनल्या आहेत. याच प्रयत्नांचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील सुमारे १८ हजार महिला ‘लखपती दीदी’ म्हणून उदयास आल्या आहेत.
उद्योगांमध्ये ४२ हजार महिला सक्रिय
महिलांना विविध व्यवसायांमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी माविमने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. कृषी सेवा केंद्र, आधुनिक शेळीपालन, कृषी अवजार बँक, दालमिल, हळद प्रक्रिया केंद्र, शेतमाल खरेदी-विक्री केंद्र, तसेच रेडीमेड वस्त्रनिर्मिती यांसारख्या उद्योगांमध्ये तब्बल ४२,४६१ महिला सक्रिय आहेत. या उद्योगांमुळे महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला असून त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही महिलांनी उल्लेखनीय प्रगती केली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये १६ ‘ड्रोनसखी’ना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून त्या ड्रोनच्या सहाय्याने शेतफवारणीची सेवा देत आहेत. हा उपक्रम महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी देतो. त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढत असून त्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून नव्या क्षेत्रात कार्यरत होत आहेत.
आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध निधींचा प्रभावी वापर केला जात आहे. ३ टक्के महिला सक्षमीकरण निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी, खनिकर्म निधी आणि नाविन्यपूर्ण योजनांमधून महिला बचत गटांना ई-रिक्षा, ड्रोन, कृषी अवजारे, तसेच विक्री स्टॉलसाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे. या माध्यमातून महिलांना उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होत असून त्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहेत.
नवतेजस्विनी प्रदर्शनीतून ६० लाखांची उलाढाल
महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हेही माविमचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यासाठी विविध प्रदर्शन आणि मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. नुकत्याच पार पडलेल्या पाच दिवसीय यवतमाळ महोत्सवात आयोजित ‘नवतेजस्विनी प्रदर्शनी’मध्ये जिल्ह्यातील ७६ महिला बचत गटांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनात गृहउपयोगी वस्तू, कडधान्ये, बांबू उत्पादने, मातीची भांडी, विविध धान्ये, शोभिवंत वस्तू आणि खाद्यपदार्थ यांचा समावेश होता. या उत्पादनांच्या विक्रीतून जवळजवळ ६० लाख रुपयांची उलाढाल झाली, जी महिलांच्या कष्टांची आणि गुणवत्तेची साक्ष देणारी आहे.
एकूणच, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाची एक प्रभावी आणि शाश्वत चळवळ उभी राहत आहे. महिलांनी केवळ आर्थिक स्वावलंबनच प्राप्त केले नाही, तर त्यांनी समाजात स्वतःचे स्थानही निर्माण केले आहे. संघटित प्रयत्न, शासनाची साथ आणि स्वतःची जिद्द यांच्या बळावर यवतमाळमधील महिला आज आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. भविष्यातही या चळवळीला अधिक बळ मिळून महिलांचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे, असा विश्वास आहे.
पवन ल. राठोड
प्र.जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ.
मो. 9595433332
