
जागतिक मृदा दिन दरवर्षी ५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि तो केवळ औपचारिक दिन न राहता शेतीच्या मुळाशी असलेल्या मातीच्या आरोग्याचा गंभीर विचार करायला भाग पाडतो. अन्नसुरक्षा, पर्यावरणीय समतोल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या तिन्हींचे केंद्रस्थान म्हणून मातीचा विचार केला तर या दिवसाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. मातीचे आरोग्य टिकवणे म्हणजे भविष्यातील अन्नसुरक्षेची हमी होय. अनियंत्रित रासायनिक खत व कीडनाशकांचा वापर, खोल नांगरट, अवास्तव सिंचन आणि पिकपद्धतीतील एकांगीपणा यामुळे मातीतील सेंद्रिय अंश कमी होतो, सूक्ष्मजीव नष्ट होऊ लागतात आणि सुपीकता घसरते. अशा पार्श्वभूमीवर मातीला “सजीव” मानून तिची निगा राखण्याचा आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा जागतिक प्रयत्न म्हणजे ‘जागतिक मृदा दिन’ होय.
कोल्हापूर जिल्ह्यात यंदा “जागतिक मृदा दिनानिमित्त चला माती समजून घेऊया शेती समृद्ध करुया” हा उपक्रम विशेष पद्धतीने राबवला जात आहे. १ जुलै २०२५ रोजी कृषि दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत हेक्टरी १२५ टन शाश्वत ऊस उत्पादकता वाढ अभियानाचा शुभारंभ झाला आणि त्याच धाग्यावर मृदा दिनाच्या उपक्रमाला दिशा मिळाली. ऊस हा जिल्ह्याचा कणा असला तरी जास्तीच्या उत्पादनाच्या शर्यतीत मातीचा थकवा वाढत चालला आहे; पाण्याचा ताण, खतांचा अवाजवी वापर आणि रोग-किडींचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शाश्वततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हेक्टरी १२५ टन उत्पादन हे ध्येय ठेवतानाच “शाश्वत” हा शब्द अग्रस्थानी ठेवणे आणि त्यासाठी मातीच्या आरोग्याला केंद्रस्थानी मानणे ही या संपूर्ण मोहिमेची खरी ताकद आहे.

मृद दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात किमान ३०० गावांमध्ये “चला माती समजून घेऊया शेती समृद्ध करुया” हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. गावोगावी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मातीची प्रत्यक्ष तपासणी, मार्गदर्शन आणि संवाद यावर भर दिला जाणार आहे. गावपातळीवर मेळावे, प्रात्यक्षिके आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचे आरोग्य जाणून घेण्याची संधी मिळेल आणि “जमीन हेच आपले भांडवल” ही जाणीव अधिक दृढ होईल.
केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने २०१५-१६ पासून राबवली जात असलेली मृद आरोग्य पत्रिका योजना या सर्व कामाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. जमिनीचे योग्य पद्धतीने नमुने घेऊन प्रयोगशाळेत विश्लेषण केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची स्वतंत्र “आरोग्य पत्रिका” दिली जाते. यात मातीचा पीएच, क्षारता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश तसेच सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेची माहिती असते आणि त्यावर आधारित खतांच्या मात्रांचे वैज्ञानिक मार्गदर्शन केले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात २०२५-२६ या वर्षातच २६ हजार शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्याचे नियोजन आहे. मात्र फक्त पत्रिका वाटप करून भूमिका पूर्ण होत नाही; शेतकऱ्यांना ती समजावून सांगणे, त्यातील आकडे वाचून प्रत्यक्ष शेतीच्या निर्णयांमध्ये रूपांतर करणे हे पुढचे महत्त्वाचे पाऊल आहे आणि याचसाठी या मृदा दिनी विशेष उपक्रम आखण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सर्वात प्रथम शास्त्रोक्त पद्धतीने माती नमुने कसे घ्यावेत याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. अनेकदा चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या नमुन्यांमुळे अहवाल दिशाभूल करणारे ठरतात आणि त्यावर आधारलेले खत व्यवस्थापनही गोंधळात टाकणारे होते. म्हणूनच योग्य खोली, झिगझॅग पद्धत, वेगवेगळ्या ठिकाणचे मिश्रित नमुने आणि स्वच्छ साधने याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यात येणार आहे. नमुने प्रयोगशाळेत गेल्यानंतर तयार होणाऱ्या मृद आरोग्य पत्रिकेतील प्रत्येक घटकाचा अर्थ, रंगकोड, शिफारसी यांचे सुलभ भाषेत स्पष्टीकरण दिले जाईल, जेणेकरून शेतकरी स्वतःही पुढे पत्रिका हातात घेऊन निर्णय घेऊ शकतील.
जमीन सुपीकता निर्देशांक आणि मृद आरोग्य पत्रिका आधारित खतांच्या संतुलित वापराबाबत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची भूमिका शेतकऱ्यांना समजावली जाईल. एका बाजूला रासायनिक खतांची शिफारस केलेली मोजकी मात्रा आणि दुसऱ्या बाजूला शेणखत, कंपोस्ट, हरभरा, सनई, ढैंचा यांसारख्या हिरवळीच्या खतांचा तसेच पीक अवशेषांच्या योग्य पुनर्वापराचा मिलाफ करून मातीला पोत, सेंद्रिय अंश आणि सूक्ष्मजीव संपन्नता परत देता येते. अशा एकात्मिक व्यवस्थापनामुळे उत्पादनात सातत्य येते, खर्चात बचत होते आणि जमिनीवर दीर्घकालीन भार न पडता पिके जोमाने वाढतात. सेंद्रिय खत वापराचे फायदे – पाण्याची वाढती धारणक्षमता, गाळ धूप कमी होणे, रोगप्रतिकारशक्ती वाढणे – हे सर्व मुद्दे उदाहरणांसह स्पष्ट केले जातील.
मृदा दिनाच्या उपक्रमाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे गावांमधील शाळांमध्ये होणारी जनजागृती. विद्यार्थ्यांना माती परीक्षणाची साधी प्रक्रिया दाखवून, मातीतील विविध थर, त्यातील जिवसृष्टी, अन्नद्रव्यांचा प्रवास यांची ओळख करून दिली तर “माती म्हणजे केवळ धूळ नसून एक जिवंत प्रणाली आहे” ही समज लहानपणीच विकसित होते. पुढील पिढी पर्यावरणाबाबत अधिक संवेदनशील आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाची बनावी, हा या प्रयत्नामागचा उद्देश्य आहे. यासोबतच महाकृषि विस्तार एआय ऍप सारख्या तंत्रज्ञानाधारित साधनांचा वापर करून पिकानिहाय खत व्यवस्थापन, रोग निदान, शासकीय योजना, अनुदान इत्यादींचे मार्गदर्शन देण्याची तयारी करण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातात ताज्या व शास्त्रीय माहितीत पोहोचण्याची ताकद आहे आणि मृदा दिनाच्या निमित्ताने त्याचा जाणीवपूर्वक वापर होणार आहे.
या सर्व प्रक्रियेत गावातील प्रगतशील शेतकरी, आत्मा शेती सल्लागार समिती, नोंदणीकृत गट, शेतकरी मित्र आणि कृषि सखी यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शेजारी शेतकरी एकमेकांचा अनुभव अधिक सहजतेने स्वीकारतात; त्यामुळे स्थानिक पातळीवर ज्ञानवाटपाचे जाळे तयार होते. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावस्तरावर उपस्थित राहून विभागाच्या विविध योजना, अनुदाने व नव्या तंत्रज्ञानाबाबत माहिती देणार आहेत. परिणामी मृदा परीक्षण हा वेगळा, एकदाच होणारा कार्यक्रम न राहता संपूर्ण शेती व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग बनू शकतो.
सर्व विभागातील शेतकरी, युवक, महिला तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. केवळ शासनाकडून योजना राबविल्या जाऊन थांबणार नाहीत, तर शेतकरी आणि समाज यांच्या सक्रिय सहभागातून त्या जिवंत राहतील, ही जाणीव यातून दिसून येते. मातीचे आरोग्य टिकवणे म्हणजे भविष्यातील अन्नसुरक्षेची हमी, ग्रामीण अर्थव्यवस्थेची घडी आणि पर्यावरणाचा समतोल जपणे होय. जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होणारा हा अभ्यासपूर्ण आणि व्यापक उपक्रम, योग्य पद्धतीने राबविला गेला तर “चला माती समजून घेऊया, शेती समृद्ध करुया” हा संदेश खरोखरच प्रत्येक शेतजमिनीपर्यंत आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनापर्यंत पोहोचू शकतो.
००००००
– सचिन अडसूळ,
जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर
