Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

कोल्हापूरमध्ये सुरू केलेल्या ‘स्मार्ट पार्किंग’ प्रणालीमुळे वाहतूक व्यवस्थापनाला नवी दिशा – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Admin | 20 views
कोल्हापूरमध्ये सुरू केलेल्या ‘स्मार्ट पार्किंग’ प्रणालीमुळे वाहतूक व्यवस्थापनाला नवी दिशा – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २३ :- महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या कोल्हापूरमध्ये, विशेषतः नवरात्रौत्सवातील भाविक आणि पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने अत्याधुनिक ‘स्मार्ट पार्किंग’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. हे महत्त्वाकांक्षी उपक्रम वाहतूक कोंडी कमी करेल, यामुळे पर्यटकांना सुलभ आणि सुखद अनुभव घेता येईल, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

कोल्हापूर हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे. स्मार्ट पार्किंग प्रणालीमुळे पर्यटकांचा अनुभव समृद्ध होईल, पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि वाहतूक व्यवस्थापनाला नवी दिशा मिळेल. हा उपक्रम राज्यातील इतर पर्यटनस्थळांवरही राबवण्याची योजना आहे. या प्रणालीचे उद्दिष्ट शहराच्या मध्यवर्ती भागातील पार्किंगची जागा सहज उपलब्ध करून देणे आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन अधिक सुटसुटीत करणे आहे. मोबाईल ॲपवर आधारित या प्रणालीमुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिक त्यांना सोयीस्कर पार्किंगची जागा शोधू शकतील आणि त्या जागेचे बुकिंग करू शकतील, असेही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, हा प्रकल्प पर्यटन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूरचा सांस्कृतिक आणि पर्यटन अनुभव अधिक सुखद आणि सोयीचा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये :

  • ऑनलाईन बुकिंग : पर्यटक मोबाईल ॲपद्वारे किंवा दिलेल्या क्यूआर कोडद्वारे पार्किंगची जागा आधीच बुक करू शकतील.
  • रिअल-टाइम अपडेट्स : उपलब्ध पार्किंगच्या जागांची माहिती रिअल-टाइममध्ये अपडेट होत राहील.
  • वाहतूक कोंडीत घट : प्रणालीमुळे वाहनचालकांना पार्किंगसाठी जागा शोधण्यात वेळ घालवावा लागणार नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल.
  • सुरक्षितता : या प्रणालीमुळे पार्किंग व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होईल.

शाश्वत पर्यटनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल – प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे

ही प्रणाली जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यटकांना सहज सुविधा देणे आणि त्यांचा अनुभव सुखकर करणे हा आमचा उद्देश आहे, असे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी सांगितले.

पर्यटकांसाठी वरदान – संचालक डॉ. बी. एन. पाटील

या प्रणालीचे सहज वापरता येणारे ॲप आणि रिअल-टाइम अपडेट्स पर्यटकांसाठी वरदान ठरतील. यातून मिळणारी माहिती भविष्यातील सुविधांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांना सांगितले.

000

संध्या गरवारे/विसंअ/


Join WhatsApp