Pune | Sun, 07 June 2026

No Ad Available

खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे – पालकमंत्री ना. मकरंद पाटील

Admin | 17 views
खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे – पालकमंत्री ना. मकरंद पाटील

बुलढाणा, दि.30 (जिमाका) : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हवामानानुसार पीक नियोजन, बियाणे व खताची उपलब्धता तसेच शेतकऱ्यांना पीक लागवडीबाबत संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात यावे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.

नियोजन भवन येथे खरीप हंगाम पूर्व नियोजन 2026-27 चा आढावा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विधानसभा आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, विभागीय वन अधिकारीजमीर शेख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री ना. पाटील म्हणाले, आगामी काही दिवसांत मान्सून सक्रिय होणार असून खरीप हंगामाची कामे सुरू होतील. त्यामुळे जिल्ह्यात खते व बियाण्यांची मुबलक उपलब्धता ठेवून शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म नियोजन करावे. यावर्षी ‘अल नीनो’च्या प्रभावामुळे मान्सूनच्या सक्रियतेबाबत संभ्रम असल्याने पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून जलसंधारण, सूक्ष्म सिंचन आणि सिंचन व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता फळबाग लागवड, भाजीपाला, बियाणे उत्पादन अशा पर्यायी पिकांना प्राधान्य द्यावे. विशेषतः कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करावी. यासाठी कृषी विभागाने गावपातळीवर जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यात 7 लाख 39 हजार 740 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 4 लाख 35 हजार 500 हेक्टरवर सोयाबीन, 1 लाख 28 हजार 220 हेक्टरवर कापूस, 99 हजार 500 हेक्टरवर तूर तर 63 हजार हेक्टरवर मक्याची लागवड होणार आहे. सोयाबीनसाठी 3 लाख 26 हजार 625 क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. महाबीज, खाजगी कंपन्या तसेच शेतकऱ्यांकडील घरगुती बियाणे यांची उपलब्धता समाधानकारक असून आवश्यकतेनुसार बियाणे उपलब्ध करुन दिल्या जाईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष ढाबरे यांनी दिली. तसेच युरिया व डीएपीसह रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून आवश्यकतेनुसार खतांचा पुरवठा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मान्सूनपूर्व काळात शेततळे, नाला बांध दुरुस्ती, खोलीकरण, तलावातील गाळ काढणे आदी जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री यांनी दिल्या. यावर्षी कमी पावसाची शक्यता लक्षात घेता जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. तसेच पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन करावे. खरीप हंगामात पिकांवर येणाऱ्या किडी व रोगांबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात यावे. यासाठी कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सेवकांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा, असे निर्देश त्यांनी दिले.

00000


Join WhatsApp