Pune | Sat, 14 February 2026

No Ad Available

कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी आवश्यक कार्यवाही त्वरीत करावी – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

Admin | 2 views
कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी आवश्यक कार्यवाही त्वरीत करावी – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. ११ : कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पाला शासनाची मान्यता असून हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक त्या सर्व अडथळ्यांचे निराकरण करण्यात यावे. तसेच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात महानगरपालिकेची बाजू सक्षम आणि प्रभावीपणे मांडण्यात यावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

मंत्रालयात मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, ऊर्जा विभागाचे सहसचिव नारायण कराड, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक जगन्नाथ साळुंखे तसेच महसूल व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कांजूरमार्ग येथे ‘वेस्ट टू एनर्जी’ या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पातून सुमारे ८,००० मेगावॅट वीज उत्पादनाची क्षमता निर्माण होऊ शकते. शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावत त्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याचा हा अभिनव उपक्रम आहे.  महानगरपालिकेच्या वतीने देवनार येथेही कचऱ्यापासून वीज निर्मितीसाठी ५०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

००००००

किरण वाघ/विसंअ


Join WhatsApp