
ठाणे,दि.१७(जिमाका) : राज्य शासनाच्या शासन निर्णय दि.16 फेब्रुवारी 2023 अन्वये राज्यात काजू फळपिक विकास योजना लागु करण्यात आली असून या अंतर्गत काजू फळ विकासाकरीता विविध योजना राबविण्यात येणार आहेत. शासनास सादर केलेल्या गोदाम उभारणीच्या योजनेकरीता 5 वर्षासाठी रु.62.50कोटीच्या अर्थसहाय्याची तरतूद करण्यात आली आहे. काजू फळपिक विकास योजनेच्या कार्यक्षेत्रात कोकण विभागातील सर्व तालुके व कोल्हापुर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, भूदरगड, गडहिंग्लज आणि राधानगरी तालुके यांचा समावेश आहे.
या योजनेंतर्गत एकूण 1,25,000 मे.टन क्षमतेचे गोदाम उभारण्यास मान्यता आहे. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडुन राज्य शासनाला 500, 1000 व 5000 मे.टन क्षमतेच्या गोदामांची उभारणीबाबतच्या योजनेचे प्रारुप सादर करण्यात आले आहे. या प्रारुपानुसार गोदाम उभारणीकरीता लाभार्थी निवडीकरीता स्वारस्य निविदाची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. इच्छुक लाभार्थींची यादी तयार करून शासनाचे मंजुरीअंती पात्र ठरलेल्या इच्छुक लाभार्थींकडून गोदाम उभारणीबाबत सविस्तर प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.
या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये काजू प्रक्रिया सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, खाजगी काजू प्रक्रिया उद्योजक/खाजगी उद्योजक, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी (PACS), तालुका खरेदी विक्री संघ आणि कृषि उत्पन्न बाजार समिती यांचा समावेश आहे. गोदाम उभारणीसाठी गोदाम क्षमतेनुसार 20 गुंठे ते 80 गुंठे जागा आवश्यक असून स्वनिधी करिता प्रकल्प खर्चाचे 15% रक्कम लाभार्थीकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे, उर्वरीत 85% निधी बँक कर्ज/स्वनिधी स्वरूपात उपलब्ध करून घ्यावयाचा आहे. गोदाम उभारणीसाठी 500, 1000 व 5000 मे.टन क्षमतेसाठी अंदाजित खर्च अनुक्रमे रु.72.49 लाख, रु. 1.20 कोटी व रु. 5.10 कोटी रुपये अपेक्षित आहे.
या योजनेंतर्गत गोदाम उभारणी करिता सविस्तर स्वारस्य निविदा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर ‘निविदा/दरपत्रक’ टॅग खाली उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.27 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे.
या योजनेचा लाभ संबधीत तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थींनी घेण्याकरीता स्वारस्य अर्ज सादर करावेत व या योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या मुख्यालयाशी 020/24528100 या क्रमांकावर प्रकल्प विभागाशी तसेच पणन मंडळाच्या विभागीय कार्यालय, रत्नागिरी येथे कृषी व्यवसाय पणन तज्ञ पवन बेर्डे दूरध्वनी क्रमांक 02352-299328 भ्रमणध्वनी क्रमांक 7218350054 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले आहे.
0000
