Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

जिल्ह्यातील ८ हजार बचत गटांच्या माध्यमातून ८० हजार महिलांना सक्षम करु –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Admin | 6 views
जिल्ह्यातील ८ हजार बचत गटांच्या माध्यमातून ८० हजार महिलांना सक्षम करु –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि.३१ : नारी शक्तीच्या सर्वांगिण विकासासाठी उमेद सारखी संस्था आपण निर्माण केली. उमेदमार्फत शहरी भागासह प्रत्येक गावखेड्यातील महिलांना विकासाच्या प्रवाहात येता यावे, त्यांना आपल्या व्यवसायाला साकार करता यावे यादृष्टीने जिल्ह्यातील 8 हजार बचत गटांमार्फत 80 हजार महिलांना सक्षम करु, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. जिल्हा खनिज प्रतिष्ठान, जिल्हा परिषद यांच्या वतीने ‘नवसखी उद्योगिनी योजनेच्या’ शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरातील ज्योत भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंह ठाकूर, आमदार डॉ. आशिष देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी आमदार टेकचंद सावरकर, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

नवसखी उद्योगिनी योजना म्हणजे कर्ज योजना  नाही. जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गतचा निधी हा रस्ते, वीज, पिण्याचे पाणी या मूलभूत योजनासाठी वापरला जायचा. आता त्याला महिलांच्या रोजगार निर्मितीची जोड आपण दिली. जिल्ह्यातील आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी याबाबत विचार करून ही योजना साकारली आहे. येत्या पाच वर्षात दरवर्षी आपण टप्प्याटप्प्याने 80 हजार महिलांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. आजच्या घडीला सूमारे 1 हजार 600 बचत गटातील 16 हजार महिलांना यातून सक्षम करीत आहोत. प्रति गट एक लाख रुपयांचा धनादेश आपण त्यांच्या व्यवसायाला साकारण्यासाठी बीज भांडवल म्हणून देत असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

उमेदच्या माध्यमातून शासनाच्या महिलांविषयक असलेल्‍या वैविध्यपूर्ण योजना अधिक प्रभावी कशा होतील याचा आम्ही विचार केला. यात समुदाय संसाधन व्यक्ती अधिक सक्षम असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन प्रत्येक समूदाय संसाधन व्यक्तीला समन्वय व संपर्कासाठी एक चांगला मोबाईल देण्याचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. याचबरोबर पुढील आर्थिक वर्षात चांगल्या दर्जाची ईलक्ट्रीक वाहन देण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

महत्वाकांक्षी योजना म्हणून आम्ही या योजनेकडे पाहत आहोत. यातून महिला सक्षमीकरणाचा एक आदर्श मापदंड निर्माण होवू शकतो. या 80 हजार महिला इतर महिलांपुढे आपल्या यशस्वी व्यवसायातून राज्यासाठी प्रेरणेचे स्रोत ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बचत गटांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महिला बचत गटांनीही हा निधी आपल्या व्यक्तीगत खर्चासाठी नाही तर विकासाचा मार्ग भक्कम करण्यासाठी आहे हे सर्व प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे. हा निधी आपले जूने कर्ज फेडण्यासाठी नाही हे सुध्दा लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक गटांनी सर्व बंधने पाळून आपल्या व्यवसायाला अधिकाधिक चांगला आकार देण्याचे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले.

बचत गटांसमवेत समूदाय संसाधन व्यक्तींनी कोणत्याही परिस्थितीत या योजनेच्या नावाखाली राजकीय स्वरुप येऊ नये याची खबरदारी घेण्यास त्यांनी सांगिले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारताचा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसीत महाराष्ट्राचा संकल्प घेतला आहे. यातील महिला सक्षमीकरणाचा जिल्ह्यातील एक मार्ग अधिक भक्कम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विनायक महामुनी यांच्या कार्यशैलीचा केला गौरव

राज्यातील सर्वसामान्य जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला शंभर दिवस आणि नंतर दिडशे दिवसांचा उपक्रम संपूर्ण प्रशासनाला दिला. यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी उत्कृष्ट काम करुन नाविण्यपूर्ण उपक्रमांची जोड दिली. दोन्ही उपक्रमात त्यांचे उत्कृष्ट कामगिरी दिसून आली. आता ही नव्याने सुरु करण्यात आलेली योजना तेवढ्याच सक्षमतेने मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यशस्वी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवसखी उद्योगिनी योजनेतून गावागावांत भांडवली गुंतवणुकीला मिळणार चालना –  राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मायक्रोफायनान्स मधील क्लीष्ट प्रक्रिया हा एक मोठा अडसर होता.  यामुळे अनेक महिलांना नियमांच्या चौकटीत पात्र होऊन व्यवसायाला आकार देतांना दमछाक व्हायची. परिणामी गावात विशेषत: खेड्यांमध्ये लहान मोठ्या व्यवसायाच्या भांडवली गुंतवणूकीबाबत अडथळा निर्माण झाला होता. तो अडथळा या नवसखी उद्योगिनी योजनेतून दूर होत असून महिलांसाठी प्रगतीचे एक नवे दालन सुरु झाल्याचे प्रतिपादन वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.

सामाजिक न्यायासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबध्द आहे. नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आपण ई-रिक्षाचे वाटप केले. सायकलींचे वाटप केले. उद्योग व्यवसायासाठी गाडे दिले. ज्या महिला आपल्या कौशल्याच्या बळावर मोठ्या हिमतीने उभ्या आहेत, विविध उत्पादने करीत आहेत अशा महिला बचत गटांच्या उत्पादनांना महानगरातील ग्राहकांपर्यंत पोहचता यावे यादृष्टीने राज्यात 10 उमेद मॉल साकारत असल्याचे ते म्हणाले.

या नवीन योजनेमार्फत महिला बचत गटांना जो निधी मिळणार आहे तो महत् प्रयासातून मिळविलेला आहे. याची जाणिव बचत गटांनी ठेवून या 1 लाखाचे 2 लाख, दोनचे चार लाख कसे होतील हे ध्येय निश्चित करण्याचे आवाहन त्यांनी महिलांना केले. या निधीतील एकही पैसा इतरत्र आम्ही खर्च करणार नाही अशी शपथ सर्वांनी या कार्यक्रमात घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी केले.

*****


Join WhatsApp