Pune | Tue, 17 February 2026

No Ad Available

हवामान बदलाच्या प्रश्नांकडे धोरणात्मक नव्हे तर नैतिक जबाबदारी म्हणून पाहणे गरजेचे -पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

Admin | 1 views
हवामान बदलाच्या प्रश्नांकडे धोरणात्मक नव्हे तर नैतिक जबाबदारी म्हणून पाहणे गरजेचे -पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. १७:- पर्यावरण आणि हवामान बदलाच्या प्रश्नांकडे केवळ धोरणात्मक नव्हे, तर नैतिक जबाबदारी म्हणून पाहणे गरजेचे आहे. हवामान बदलाकडे तरुणाईची जागरूकता हीच हवामान कृतीची खरी ताकद असून आपली जबाबदारी समजली तर भविष्यही समजते, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे मुंबई क्लायमेट वीक; स्केलिंग अप क्लायमेट फायनान्स फॉर अ सस्टेनेबल ॲण्ड रेजिलिएंट महाराष्ट्र या विषयाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रास पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, वर्ल्ड रिर्सोसेस इन्स्टि्यूट (डब्लू आर आय) इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव पै, डब्लूआरआय इंडियाचे असोसिएट प्रोग्राम डायरेक्टर सारांश बाजपेयी, कौन्सिल ऑन एनर्जी एनव्हायरमेंट अँड वॉटर (सीईईडब्लू) प्रोग्राम लीड डॉ. पुष्प बजाज आदी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री पकंजा मुंडे म्हणाल्या, पर्यावरण आणि हवामान बदलाच्या प्रश्नांमध्ये तरुणाई सहभागी होत आहे, ही अत्यंत प्रेरणादायी बाब असून पुढील पिढ्यांसाठी शाश्वततेची जाणीव ठेवणे हे सामूहिक कर्तव्य आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम, वाढते तापमान, अनियमित पाऊस, पाण्याची टंचाई आपण अनुभवत आहोत. पर्यावरण रक्षणासाठी आज केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम भविष्यात दिसतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, पर्यावरण शिक्षणाला शालेय पातळीवर अधिक महत्त्व देण्याची गरज असून नागरिक शास्त्राप्रमाणेच पर्यावरण हा स्वतंत्र विषय म्हणून पुढील पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. पर्यावरणीय हानी कमी करण्यासाठी नियोजनपूर्वक आणि जबाबदारीने निर्णय घेणे आवश्यक आहे. भविष्यातील संकटांचा भार पुढील पिढीवर पडू नये, यासाठी अधिक सजगतेची गरज असल्याचेही मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या.

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखणे आवश्यक असल्याचे सांगत मंत्री मुंडे म्हणाल्या, निसर्गावर कोणत्याही प्रदेशात अतिक्रमण केले तरी त्याचा परिणाम संपूर्ण मानव जातीवर होतो. हवामान बदल ही स्थानिक नव्हे, तर जागतिक जबाबदारी आहे. पर्यावरण संवर्धनासाठी उपलब्ध होणारा निधी परिणामकारकतेवर लक्ष केंद्रित करून खर्च झाला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी म्हणाले, देशांतर्गत उपलब्ध आर्थिक साधनसंपत्ती आणि विविध वित्तीय यंत्रणांच्या माध्यमातून हवामानपूरक प्रकल्प राबविणे ही काळाची गरज आहे.

नवीन पायाभूत सुविधा उभारताना त्या थेट हवामानपूरक करणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रात विकेंद्रीत सौरऊर्जेचा मोठा फायदा होत असून लाखो शेतकरी सौर प्रकल्पांशी जोडले जात आहेत. वाहतूक कोंडी, वायूप्रदूषण यावर सार्वजनिक वाहतूक हा प्रभावी उपाय असून, तो विकासासोबतच हवामानासाठीही लाभदायक आहे.

प्रवीण परदेशी पुढे म्हणाले, सांडपाण्याचा पुनर्वापर, पीक पद्धतीत बदल यासारखे निर्णयही शाश्वत विकासाला चालना देतात. त्या अनुषंगाने स्वतंत्र हवामान निधी निर्माण करतानाच विकास कार्यक्रमांनाही हवामानपूरक स्वरूप देणे अधिक परिणामकारक ठरेल.

अद्ययावत राज्य हवामान बदल कृती आराखडा, नवीकरणीय ऊर्जा धोरण आणि ‘जस्ट ट्रान्झिशन’ रोडमॅप यांमुळे महाराष्ट्र उपराष्ट्रीय हवामान कृतीत आघाडीवर असल्याचे (डब्लू आर आय) इंडिया असोसिएटचे प्रोग्राम डायरेक्टर सारांश बाजपेयी यांनी सांगितले.

तसेच ’परिवर्तन : एव्हरी तालुका क्लायमेट रेडी’ उपक्रमाद्वारे राज्यस्तरीय आढाव्यापलीकडे जाऊन तालुकास्तरावर हवामान विश्लेषण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्लायमेट फायनान्स डॅशबोर्डद्वारे राज्यातील निधी प्रवाह पारदर्शकपणे मांडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. पुष्प बजाज यांनीही मनोगत व्यक्त केले. पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज यांनी आभार मानले.

०००

एकनाथ पोवार/स.सं


Join WhatsApp