
मुंबई, दि. १८ : हवामान बदलाशी लढण्यासाठी बांबू लागवडीसारखे नैसर्गिक उपाय करणे गरजेचे आहेत. त्यासाठी बांबूच्या उपयोगाचे महत्त्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे, शासकीय धोरणांमध्ये योग्य समन्वय आणि स्थानिक लोकांचा सक्रिय सहभागही असणे महत्त्वाचे आहे, असे मत जागतिक बांबू परिषदेत तज्ज्ञांनी मांडले.
आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (MITRA) व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने आयोजित बांबू परिषदेत “हवामान बदलाशी लढण्यासाठी बांबूचा उपयोग” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी विविध विषयांवरील तज्ज्ञांनी यात मत मांडले. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते, टेरा डो संस्थेचे सह-संस्थापक डॉ. मयंक जैन, बिट्स पिलानी संस्थेचे प्राध्यापक डॉ. अभिषेक शर्मा, नागालँड विद्यापीठाच्या ग्रामीण विकास आणि नियोजन विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. जयंत चौधरी, मालविका हर्बा फार्मचे संचालक दिनेश शर्मा यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. ज्युरियन सस्टेनेबिलिटीचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक कृणाल नेगांधी यांनी पॅनेल चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. “बांबू फॉर पीपल, प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी : ग्रीन गोल्ड, ग्रीन एनर्जी, ग्रीन अर्थ” अशी संकल्पना घेऊन या महत्त्वपूर्ण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
शुभांगी भुते म्हणाल्या की, हवामान बदल पूर्णपणे रोखणे शक्य नाही. परंतु तो कमी कसा करता येईल आणि त्यासाठी बांबूची भूमिका महत्त्वाची असणार आहे. बांबूचे अनेक फायदे असल्याने त्याच्याकडे पीक म्हणून न पाहता एक उत्पादन म्हणून पाहिले पाहिजे. शाश्वत विकासासाठी शेतकऱ्यांनाही बांबूचे फायदे सांगायला हवेत.
श्री. चौधरी म्हणाले की, ईशान्य भारतात बांबू हा त्यांच्या जीवनशैलीचा भाग झाला आहे. बांबू हे केवळ एक झाड किंवा पीक नाही, तर तो जीवनाचा भाग झाला आहे. भारतात बांबू उत्पादनाला चालना द्यायची असेल तर धोरण निर्मितीबरोबरच जनसमुदायाचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. क्लायमेट चेंज, कार्बन ट्रेडिंग हे शब्द गावकऱ्यांसाठी परके आहेत. बांबू लागवडीमुळे त्यांना कसा फायदा होणार आहे. ही माहिती त्यांच्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बांबू उत्पादनाच्या खरेदी व मार्केटिंगवर भर देणे आवश्यक आहे
डॉ. मयंक जैन यांनी सांगितले की, जर नैसर्गिक उपायांमध्ये कोणता सुपरस्टार असेल, तर तो बांबूच आहे. महाराष्ट्राने बांबू उत्पादनाच्या दिशेने काही चांगली पाऊले उचलली आहेत, परंतु अजूनही बऱ्याच गोष्टी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जंगल व्यवस्थापनाच्या एकूण उद्दिष्टांपैकी एक चतुर्थांश बांबू लागवड प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहे, ही मोठी गोष्ट आहे.
डॉ. शर्मा यांनी सांगितले की, भारतात सध्या ४० मिलियन हेक्टरवर बांबू लागवड आहे आणि ती ५० मिलियन हेक्टरपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. बांबूपासून ऊर्जा निर्मिती, पेट्रोलियम तेलाची जागा घेणारे इंधन तयार करणे, तसेच कार्बन साठवणूक शक्य होते. बांबूपासून कार्बन क्रेडिट्सही मिळू शकतात. त्याचबरोबर स्टील उद्योग, रबर उद्योग आणि बॅटरी उत्पादन क्षेत्रातही बांबूपासून तयार होणाऱ्या पदार्थांचा वापर शक्य आहे.
नेगांधी यांनी समारोप केला. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे दिली.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ
