Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

गावाच्या विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

Admin | 19 views
गावाच्या विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

  • कोक येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ
  • पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टीने बाधित पिकाची पाहणी 

परभणी, दि. १७ (जिमाका) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आज राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगांव (ता. फुलंब्री) येथे झाला. यानिमित्य जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ जिंतूर तालुक्यातील कोक येथे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला. गावाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जिल्ह्यातील ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी पालकमंत्री यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परषिदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले आदीसह नागरिक उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यस्तरीय कार्यक्रमाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी प्रक्षेपन करण्यात आले होते.

पालकमंत्री म्हणाल्या की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास केला जाणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 करीता पंचायत राज संस्था गतिमान करणे तसेच सुशासनयुक्त पंचायत तयार करणे, पंचायत राज संस्थाना आर्थिक दृष्टया सक्षम करणे, गावांना जल समृद्ध करणे, स्वच्छ व हरित गाव तयार करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे. उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने या अभियानात सहभागी होवून आपल्या गावाचा विकास करावा. तसेच या अभियानाच्या माध्यमातून ग्राम पातळीवर सेवा व दाखले ऑनलाईन देण्यात येणार आहेत. गावातील शाळांना सुविधा पुरविणे, अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण, पशुवैद्यकीय उपचार केंद्र सुविधा, स्मशानभूमी सुविधा, धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. गावातील रस्ते व शेत शिवारातील पाणंद रस्ते पक्के करण्यात येणार आहेत. गावातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेतून पक्के घरे देण्यात येणार आहेत. मनरेगा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन जलसंवर्धन, नवीन विहीर, शेततळे, जनावरांसाठी गोठा इत्यादी कामे केली जाणार आहेत. तसेच नागरिकांनी गावाची स्वच्छता करावी आणि या योजनेत लोकसहभागातून सहभागी होवून उत्कृष्ट कार्य करुन पारितोषिके मिळवावीत, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करुन मार्गदशन केले. दरम्यान सदर कार्यक्रमानंतर पालकमंत्री यांनी परभणी तालुक्यातील वाडी दमई शिवारातील अतिवृष्टीने बाधित पिकाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

 

०००


Join WhatsApp