Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

डोळे अंधारात… पण पाऊल प्रकाशात !

Admin | 18 views
डोळे अंधारात… पण पाऊल प्रकाशात !

आज राज्यभर नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांचा उत्साह जाणवत होता.

शहरातून फिरताना काही मतदान केंद्रांवर उमटणारा मतदारांचा उत्साह मात्र मनाला ऊर्जा देणारा होता. अशा वातावरणात एक प्रसंग नजरेसमोर आला आणि क्षणभर मन थांबूनच राहिलं… एक दिव्यांग मुलगा, नवनाथ उत्तम भोई, आपल्या दृष्टीहीन आईचा हात अलगद धरून तिला मतदानासाठी घेऊन जात होता. दैनंदिन संघर्षाच्या सावल्या झेलत जगणाऱ्या सखुबाई उत्तम भोई आणि तिला आधार देत लोकशाहीच्या मंदिरात नेत असलेला तिचा मुलगा…

हे दृश्य मनाला हेलावणारे आणि त्याचवेळी आमच्यासारख्या सक्षम व सुशिक्षित लोकांच्या अंतर्मनातील अंधारात प्रकाश पाडणारेही. कारण इथे फक्त मतदान नव्हते; इथे कर्तव्याचा हात आणि विश्वासाची बोटं एकत्र येऊन लोकशाहीचा सर्वात सुंदर अर्थ प्रकट करत होती. मतदानासाठी सुटी मिळूनही मतदान टाळणाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने हा एक मोठा संदेश होता.

त्या एका क्षणात जाणवलं, लोकशाहीची खरी शक्ती मोठ्या सभा आणि गर्दीत नाही, तर अशा साध्या, नि:शब्द, ममता आणि कर्तव्याच्या भारलेल्या पावलांत उमटत असते.

भारताची राज्यघटना तयार होत असताना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक ठाम भूमिका होती, भारतातील प्रत्येक नागरिकाला, तो गरीब असो की श्रीमंत, शिक्षित असो की अशिक्षित, दिव्यांग असो वा दुर्बल, समान मतदानाचा हक्क मिळालाच पाहिजे. त्यामुळे आज सर्वसामान्य नागरिक एक अधिकार म्हणून मतदान करतात.

मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे, ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. मतदान म्हणजे केवळ एक बटण दाबणे नव्हे; ते आपल्या संविधान, स्वातंत्र्य आणि आपल्या भविष्याचा सन्मान करणारी कृती आहे. पुढची पाच वर्षे लोकशाही कोणत्या हातात जाणार, हे आपल्या एका मताने ठरते. त्यामुळे मत देणे म्हणजे भविष्यासाठी घेतलेला सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरतो.

भारताची लोकशाही ही सामाजिक लोकशाहीचे प्रतिबिंब आहे. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी जितके सक्षम आणि प्रामाणिक असतील, तितका देशाचा कारभार सुयोग्य रित्या चालेल. त्यामुळे मतदान करून योग्य लोकांना निवडणे ही लोकशाहीची पहिली अट आहे.

मतदान न करणारे लोक आपल्या जबाबदारीबाबत उदासीन आहेत असेच म्हणावे लागेल. मतदानासाठी मिळालेल्या सुट्टी दिवशीही मतदान करणे आपले कर्तव्य आहे, जे सक्षम लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे. निवडणूक आयोगाने मतदानाला उत्सवासारखे साजरे करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, आणि उत्सवाची सुरुवात आपल्या एका मतानेच होते.

संविधानाने आपल्याला एक भेदक अस्त्र दिले आहे मतदान. अमिष, दबाव, भेटवस्तू किंवा पैशाच्या मोहाला बळी न पडता, स्वच्छ लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे.

मतदान करणे म्हणजे संविधानाचा सन्मान राखणे.

आणि हा सन्मान नवनाथ उत्तम भोई आणि त्यांच्या दृष्टीहीन मातेनं अत्यंत उत्साहात राखला. म्हणून हिंदी आणि उर्दूतील प्रसिद्ध शायर शकील आज़मी यांची शब्दरचना या प्रसंगाला अधिक साजेशी ठरते…

‘हार हो जाती है जब मान लिया जाता है,

जीत तब होती है जब ठान लिया जाता है’…

०००

  • रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

Join WhatsApp