Pune | Sat, 14 February 2026

No Ad Available

देशातील पहिल्या ‘मुंबई क्लायमेट वीक’चे १७ ते १९ फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन

Admin | 2 views
देशातील पहिल्या ‘मुंबई क्लायमेट वीक’चे १७ ते १९ फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन

 

मुंबई, दि. 11  : हवामान बदलाच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर भारतातील पहिला मुंबई क्लायमेट वीक (एमसीडब्ल्यू) १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून ग्लोबल साऊथ देशांसाठी हवामान विषयक नेतृत्वाचे नवे व्यासपीठ उभारले जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या क्लायमेट वीकच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील विविध देशांतील शासनप्रमुख, उद्योग क्षेत्रातील प्रमुख, हवामान तज्ज्ञ, विविध संस्था, युवक आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येणार आहेत.

हा उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केला असून, महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, ‘एमएमआरडीए’ आणि मुंबई महापालिका सहकार्य करणार आहे.

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे या क्लायमेट वीकचे मुख्य केंद्र (हब) उभारण्यात येणार असून, शहरभर महाविद्यालये, समुदाय व सांस्कृतिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांची ‘हब-अँड-स्पोक’ पद्धतीने आखणी करण्यात आली आहे. हवामानाशी निगडित प्रत्यक्ष उपाययोजना प्रदर्शित व विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती या उपक्रमाचे आयोजक प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी दिली.

या उपक्रमाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबई क्लायमेट वीक भारताची हवामान विषयक कृतीशील भूमिका अधोरेखित करतो. शासन, उद्योग, वित्त, तज्ज्ञ आणि युवक यांना एकत्र आणून महाराष्ट्र स्वच्छ, सुरक्षित व शाश्वत भविष्य घडवण्यासाठी सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश याद्वारे जाईल.”

प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी म्हणाले, “मुंबईची जिद्द आणि कल्पकता हवामान संकटांसमोर ठामपणे उभी राहील. नागरिकांच्या सहभागातून उभा राहणारा हा भारतातील पहिला व्यापक हवामान चळवळीचा प्रयोग ठरणार आहे.”

विविध परिसंवाद,  इनोव्हेशन चॅलेंज, युवक हरित नवकल्पना स्पर्धा

मुंबई क्लायमेट वीकच्या मुख्य हबमध्ये नेतृत्व संवाद, विविध परिसंवाद, इनोव्हेशन चॅलेंज, युवक हरित नवकल्पना स्पर्धा आणि उपाययोजना प्रदर्शन भरवले जाणार आहे. पहिल्या दिवशी प्रिन्स विल्यम यांच्या संकल्पनेतील अर्थशॉट प्राईज सादरीकरणाचा विशेष कार्यक्रम होणार असून, निसर्ग, अन्नप्रणाली व लोककेंद्रित उपायांवर भर असेल. या उपक्रमात अंतराळवीर राकेश शर्मा आणि शुभांशु शुक्ला विद्यार्थ्यांशी संवाद साधून विज्ञान, अवकाश आणि हवामान जबाबदारी यावर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाची मांडणी अन्नप्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी शाश्वतता या तीन स्तंभांवर आधारित आहे. नवकल्पनांना चालना देण्यासाठी ‘एनएसई’च्या सहकार्याने इनोव्हेशन चॅलेंज आयोजित करण्यात आले असून अंतिम फेरीत निवडलेल्या कल्पनांना धोरणकर्ते व गुंतवणूकदारांसमोर सादरीकरणाची संधी मिळणार आहे.

मुंबई शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक व्याख्याने, चित्रपट प्रदर्शन, कला-संस्कृती कार्यक्रम आणि नागरिक कार्यशाळांद्वारे हवामान कृती लोकाभिमुख करण्यात येणार आहे. प्रदर्शन क्षेत्रात स्टार्टअप, उद्योग, विद्यापीठे आणि स्वयंसेवी संस्था प्रत्यक्ष उपाययोजना मांडतील, असे आयोजकांनी कळविले आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक या कार्यक्रमाचा प्रमुख भागीदार असून डेलॉइट धोरणात्मक ज्ञान भागीदार आहे. टीआयएसएस व आयआयटी मुंबई शैक्षणिक भागीदार आहेत. या मंचातून नागरिकांना कविता, कथा, गीत आणि अनुभवांच्या माध्यमातून हवामान बदलावरील मते मांडण्याची संधी मिळणार आहे. युनिसेफच्या ‘यु वाह’ उपक्रमाद्वारे युवक नेतृत्वाला चालना दिली जाणार आहे.

या उपक्रमात 30 हून अधिक देशांतील प्रतिनिधी, केंद्र-राज्य शासनाचे प्रतिनिधी, वित्त संस्था, उद्योग, सामाजिक क्षेत्र व अकादमिक जगतातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

जागतिक स्तरावरील हिलरी क्लिंटन, बिल गेट्स, राजीव शाह (रॉकफेलर फाउंडेशन), आयएफसीचे इमाद फखुरी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, यांसारखे   मान्यवर या उपक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योग मंत्री पियूष गोयल यांसह विविध राज्यांचे नेते, उद्योग व वित्त क्षेत्रातून जमशेद गोदरेज, नादिर गोदरेज, अमित चंद्रा, व्ही. वैद्यनाथन, स्वयंसेवी संस्था व संशोधन क्षेत्रातून रोहिणी निलेकणी, सौम्या स्वामीनाथन, मृदुला रमेश आणि पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

 


Join WhatsApp