Pune | Wed, 18 February 2026

No Ad Available

चौथे विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये होणार – मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत

Admin | 1 views
चौथे विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये होणार  – मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत

  • स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांची घोषणा
  • साहित्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यक भालचंद्र नेमाडे यांना
  • विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना

मुंबई,दि.१७ : चौथे विश्व मराठी संमेलन यावर्षी नाशिकमध्ये होत असून, हे संमेलन २६, २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत आणि मराठी भाषा दिना निमित्ताने २०२५ चे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना, श्री.पु.भागवत पुरस्कार नांदेड येथील निर्मल प्रकाशन संस्थेस, डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ.दिलीप धोंगडे आणि आपटे वाचन मंदिर इचलकरंजी, कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार विनोद नारायण कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद याच बरोबर २०२४ चे स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत म्हणाले, २०२५ यावर्षीचा साहित्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यक भालचंद्र नेमाडे यांना देण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि दहा लाख रुपये असे आहे. तसेच कलारत्न पुरस्कार संगीतकार अजय आणि अतुल गोगावले यांना देणात येणार असून या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पाच लाख रुपये असे आहे. यावर्षीपासून विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार सुरू करण्यात येत तो आंळदी येथील शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कूरेकर यांना देण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पाच लाख रुपये असे आहे. तर डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ.दिलीप धोंगडे आणि आपटे वाचन मंदिर यांना, तसेच कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार विनोद नारायण कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद यांना जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि दोन लाख रुपये असे आहे. नाशिक येथे १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत साहित्यक आणि संस्थांची निवड करण्यात आली. २०२४ चे देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार प्रकारातील प्रोढ वाड्मय (२२), बाल वाड्मय (६), प्रथम प्रकाशन (६), सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार (१) अशे एकूण ३५ पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी यावेळी सांगितले.

नाशिक येथे चार दिवस होत असलेले विश्व मराठी संमेलनाचे निमंत्रक आणि मराठी भाषा मंत्री म्हणून संमेलनास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करून मंत्री डॉ.सामंत म्हणाले, चौथ्या विश्व मराठी संमेलनात मराठीच्या उन्नतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याच्यामध्ये मराठी भाषेचा संगीत क्षेत्रामधला ब्रँड अम्बॅसिडर, मराठी भाषेचा लेखक म्हणून ब्रँड अम्बॅसिडर, अशी नवीन संकल्पना आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच पाच कोटी रुपयांची इमारत लंडन येथे खरेदी केली असून त्याठिकाणी पुढच्या दोन महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने वैश्विक मराठी भाषा केंद्र सुरू करणार असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार -२०२५

महाराष्ट्र शासनाच्यावतीने साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कै. विंदा करंदीकर यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरूप रूपये दहा लाख रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. निवड समितीकडून विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या ज्येष्ठ साहित्यिकास दरवर्षी  २७ फेब्रुवारी रोजी आयोजित मराठी भाषा गौरवदिन कार्यक्रमात सदर पुरस्कार शासनाकडून प्रदान केला जातो. २०२५ चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे.

 

श्रीनिवास विनायक कुलकर्णी –

मराठीतील ललित लेखक म्हणून सुप्रसिद्ध आहेत.  त्यांची डोह, सोन्याचा पिंपळ , पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा  ही प्रमुख पुस्तके प्रसिद्ध आहेत. मौज प्रकाशन गृह, मुंबई या प्रकाशन संस्थेचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर (सांगली) या, ग्रामीण परिसरात वाङ्मयीन उपक्रम  करणाऱ्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातल्या बहुतेक विद्यापीठांतून त्यांचा ‘डोह’ हा ललित लेख संग्रह पदवी व पदव्युत्तर अभ्यासासाठी निवड करण्यात आला आहे. धारवाड विद्यापीठात ‘डोह’ व ‘सोन्याचा पिंपळ’ या संग्रहाची पदवी व पदव्युत्तर अभ्यासासाठी निवड झाली आहे.कोलकाता येथील ‘भारतीय भाषा परिषद’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ‘ त्यांच्या  ‘शाळेचा दिवस’ या ‘पाण्याचे पंख’ संग्रहातल्या लेखनाचा ‘The day of the school’ नावाने इंग्रजीत अनुवाद झाला आहे. साहित्य अकादमी दिल्लीने प्रसिद्ध केलेल्या, मराठीतील निवडक ललित लेखांच्या प्रातिनिधिक संग्रहात त्यांचे लेखन समाविष्ट आहे. दूरदर्शन व अन्य अनेक वाहिन्या आणि आकाशवाणी यांवर त्यांच्या मुलाखती व भाषणे प्रसारित झाली आहेत. साहित्य अकादमीच्या ग्रंथपारितोषिक सल्लागार समितीचे ते भूतपूर्व सदस्य राहिले आहेत. त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशन, रणजित देसाई, मृण्मयी, यशवंतराव चव्हाण क-हाड, महाराष्ट्र राज्य शासन वाङ्मय पुरस्कार इ. पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

श्री.पु.भागवत पुरस्कार – २०२५

महाराष्ट्र शासनाच्यावतीने साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेस मराठी प्रकाशन व्यवसायात मोलाचे कार्य करणारे श्री.पु.भागवत यांच्या नावे दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप रूपये पाच लाख रोख, मानचिन्ह  व मानपत्र असे आहे. निवड समितीकडून श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रकाशन संस्थेस दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी आयोजित मराठी भाषा गौरवदिन कार्यक्रमात सदर पुरस्कार शासनाकडून प्रदान केला जातो. सन 2025 चा पुरस्कार नांदेड येथील निर्मल प्रकाशन संस्थेस जाहीर करण्यात आला आहे.

निर्मल प्रकाशन, नांदेड

निर्मल प्रकाशनाने विविध काव्यसंग्रह कथासंग्रह, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र , वैचारिक-, समीक्षा, बालकवितासंग्रह , बालकथा , लेखसंग्रह , संदर्भग्रंथ , नाटक, ललित, इतिहास , प्रवासवर्णन , व्यक्तिरेखा , विज्ञान आरोग्य या वाङ्मय प्रकारातील 801 पुस्तक प्रकाशित केली आहेत. निर्मल प्रकाशनांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे विविध वाङ्मय प्रकारास दिले जाणारे 27 राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 1989 ते 1995 या काळात ‘निर्मल साहित्य शोभा’ हे वाङ्मयीन नियतकालिक प्रकाशित केले. निर्मल प्रकाशनाच्या माध्यमातून ग्रंथप्रदर्शन, साहित्य संमेलने, ग्रंथालय संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन इत्यादी आयोजित केले. निर्मल प्रकाशनाने पुढील नामवंत लेखकांची पुस्तके प्रकाशित केली. त्यात डॉ. गंगाधर पानतावणे, प्राचार्य रा.रं. बोराडे, डॉ. ताराबाई परांजपे, डॉ.न. गो. राजूरकर, डॉ. शिवाजी गऊळकर, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. दत्ता भोसले, यदुनाथ थत्ते, प्रा. दत्ता भगत, यशवंत मनोहर, डॉ. निर्मलकुमार फडकुले, प्रा. रुस्तुम अचलखांब, इंद्रजित भालेराव, प्रा.बा.ह. कल्याणकर, महावीर जोंधळे, फ.म. शहानिदे, डॉ. किशोर सानप, डॉ. फ. मुं. शिंदे, विठ्ठल वाघ, श्रीपाद सबनीस, प्रा. भगवंत क्षिरसागर इत्यादी लेखकांचा समावेश आहे.

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार जाहीर करणारा शासनादेश जारी करण्यात आला आहे.

0000

गजानन पाटील/स.सं

 


Join WhatsApp