
मुंबई, दि. १७ : जगासमोर सध्या बऱ्याच क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्याची क्षमता भारतीय स्टार्टअप मध्ये आहे. भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी ‘ स्टार्टअप’ ची परिसंस्था बनला आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताजमहाल हॉटेल मधील क्रिस्टल सभागृहात आयोजित भारत – फ्रान्स स्टार्टअप मंचच्या कार्यक्रम प्रसंगी काढले. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आणि फ्रान्स पुन्हा जूनमध्ये ‘ भारत इनोव्हेट्स २०२६’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात फ्रान्समध्ये एकत्र येणार आहेत. यावेळी हवामान बदल, सुरक्षा, आरोग्य या क्षेत्रात समाधान शोधत असलेले भारतातील ‘ बेस्ट स्टार्टअप’ जगासमोर आणण्यात येतील. अटल इनोव्हेशन मिशन २४ फेब्रुवारी रोजी दशक पूर्ण करणार आहे. या मिशन अंतर्गत १० हजार पेक्षा जास्त टिंकरिंग प्रयोगशाळांच्या माध्यमातून १ कोटीहून अधिक विद्यार्थी स्टार्टअपसोबत कार्यरत आहेत. तसेच १०० हून अधिक इन्क्युबेटर्स आणि अनेक एडटेक स्टार्टअप्स या मोहिमेशी जोडलेले आहेत. यावेळी उपस्थित उद्योजकांना अटल इनोव्हेशन मिशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी केले.
विकसित भारताच्या प्रवासाला स्टार्टअपचे इंजिन आवश्यक आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातही स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच ‘ कंटेंट’ निर्मिती मजबूत करण्यासाठी १५ हजार शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये ‘कंटेंट क्रिएटर लॅब्स’ स्थापन केल्या जाणार आहे. एआय, क्वांटम, बायोटेक, सेमीकंडक्टर आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात मिशन मोडमध्ये काम सुरू आहे. तसेच वस्त्रोद्योग, रसायन, क्रीडा साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स आणि पायाभूत सुविधा अशा प्रत्येक क्षेत्रात स्टार्टअपला चालना दिली जात आहे. महिला नेतृत्वाखालील संशोधन आणि स्टार्टअप मध्ये भारत जगात आदर्श उदाहरण बनत असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
भारत आणि फ्रान्सबद्दल बोलताना आमची भागीदारी केवळ स्टार्टअप वर आधारित नसून ती विश्वास आणि समान मूल्यांवर उभी आहे. या दृष्टीकोनातून राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि मी २०२६ हे वर्ष ‘भारत–फ्रान्स स्टार्टअप वर्ष’ म्हणून घोषित केले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
भारत आणि फ्रान्स यांनी अनेक धोरणात्मक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये सहकार्य केले असून परस्पर विश्वास अधिक दृढ केला आहे. दोन्ही देशांचे संबंध ‘विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी या स्तरावर नेले आहेत, असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
भारत ‘ स्टार्टअप‘मध्ये केवळ सहभागीदार नसून नेतृत्व करणारा देश – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन
यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले, जगातील अनेक नामांकित कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे भारतीय आहेत. भारत हा केवळ जागतिक स्टार्टअप मध्ये सहभागी होत नाही, तर तो त्याचे नेतृत्व करतो. स्टार्टअप साठी शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये गुंतवणूक करणे अत्यावश्यक असते. फ्रान्स-भारत एरोनॉटिक्स कॅम्पस विशेष कौशल्य विकसित करण्याची संधी प्रदान करीत आहे. भारत स्टार्टअप करतो का, हा प्रश्न आता उरलेला नाही. खरा प्रश्न हा आहे, की भारतासोबत नवोपक्रम कोण करणार आणि त्याचे उत्तर म्हणजे फ्रान्स आहे. फ्रान्सला भारतासोबत उज्वल भविष्यासाठी काम करायचे आहे. भारत-फ्रान्स संबंध चिरायू राहोत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानुसार जी-७ परिषदेच्या आदल्या दिवशी ‘इनोव्हेशन डे’ आयोजित करण्यात येणार आहे. फ्रान्स-भारत संयुक्त उपक्रमांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी आणि संशोधकांना एकत्र आणले जाणार आहे. संरक्षण क्षेत्रात फ्रान्स ‘मेक इन इंडिया’चा ठाम आणि विश्वासू भागीदार आहे. फ्रान्सच्या सहकार्यामुळे पुढील पिढीचे इंजिन, बहुउद्देशीय हेलिकॉप्टर, अत्याधुनिक लढाऊ विमाने, पाणबुड्या आदींचा विकास शक्य होत आहे. या भागीदारीवर भारताने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभारही मानले.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन म्हणाले, हे केवळ संरक्षण करार किंवा करारांची मालिका नाही, ही एक सार्वभौम आघाडी आहे. दोन महान राष्ट्रे जमीन, समुद्र आणि आकाश या तिन्ही क्षेत्रांत एकमेकांची निवड केवळ पर्याय नसल्यामुळे नव्हे, तर ठाम विश्वासामुळे करतात. तेव्हा हे शक्य होते. अवकाश क्षेत्रातही सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘त्रिश्ना’ उपग्रहाचा विकास हा वैज्ञानिक उत्कृष्टता आणि औद्योगिक कौशल्य एकत्र आल्यास काय होते, याबाबत उत्तम उदाहरण म्हणून समोर येते.
यावेळी भारत आणि फ्रान्समधील स्टार्टअप उद्योजक उपस्थित होते.
0000
