Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Admin | 11 views
बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. 17: बचत गटातील प्रत्येक महिला काटकसरी आहे. बचतीचे महत्त्व या महिलांना उत्तमरीत्या समजले आहे. आज या महिला केवळ गृहिणी राहिलेल्या नाहीत, तर उद्योगव्यवसाय क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा दीप प्रज्वलित करत आहेत. उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

नशिराबाद येथे महिलांसाठी ‘बहिणाबाई मार्ट’ उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचे काम सुरू झाले आहे. हे कॉम्प्लेक्स पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी स्थायी व्यवसाय केंद्र तयार होणार आहे. महिलांना आपल्या उत्पादनांची विक्री स्थानिक बाजारपेठेत करण्याची संधी मिळणे म्हणजे ग्रामीण महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी नशिराबाद व परिसरातील महिला बचत गटांच्या लघुउद्योजिकांसाठी उभारण्यात आलेल्या महिला बचत गट मॉलचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. या मॉलमध्ये महिलांनी साडी, लेडीज गारमेंट्स, बांगड्या, ब्युटी पार्लर साहित्य, जनरल स्टोअर, फरसाण, स्वीट्स, चाट सेंटर, भाजीपाला विक्री आदी १३ विविध व्यवसायांची दुकाने सुरू केली आहेत. काही दुकाने स्वतःच्या मालकीची असून काही महिलांनी ती भाड्याने घेतली आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेला हा मॉल हा केवळ व्यवसाय नव्हे, तर महिलांच्या स्वप्नांचा उत्सव ठरला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमांगी टोकेकर यांनी केले, प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक रवींद्र सूर्यवंशी यांनी केले, तर स्वाती सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, गटविकास अधिकारी सरला पाटील, जिल्हा व्यवस्थापक एच. एम. भोई, हायस्कूल चेअरमन पिंटू शेठ पाटील, शहर प्रमुख विकास धनगर, संचालक चंदू भोळे, युवा सेनेचे चेतन बऱ्हाटे, दीपक खाचणे, तसेच महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा प्रमिला सपकाळे, ग्रामसंघ अध्यक्षा सोनल टापरे, सुनिता शिवरामे यांसह नशिराबाद व परिसरातील मोठ्या संख्येने महिला बचत गट सदस्य उपस्थित होत्या.

बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सबलीकरण – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दिनांक 17 ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा): महिला स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण हे शासनाचे प्राधान्य असून, ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगार आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या बचतगटांच्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे उद्घाटन जीएस ग्राउंड, जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना उत्तम बाजारपेठ मिळावी या उद्देशाने ‘बहिणाबाई मॉल’सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यात महिला स्वावलंबनाचे एक यशस्वी मॉडेल निर्माण झाले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अशा ‘बचतगट मॉल ची उभारणी करण्यात येत असून, महिलांना त्यांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या अधिक सक्षम, स्वावलंबी आणि उद्योजक बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0 0 0


Join WhatsApp