Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची पालकमंत्र्यांकडून पाहणी; बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद

Admin | 22 views
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची पालकमंत्र्यांकडून पाहणी; बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद

चंद्रपूर, दि. २४ : अतिवृष्टीमुळे झालेल्या चिमूर आणि वरोरा तालुक्यातील शेतमालाची  जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी आज बांधावर जाऊन पाहणी केली व शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल होते.

चिमूर तालुक्यातील भिसी येथे प्रकाश खाटीक व विलास खाटीक यांच्या शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणी, वाहनगाव येथील बालाजी जुगनाके, बोथली येथील नितीन खापणे, खामगाव येथील शालू रामटेके तसेच वरोरा तालुक्यातील चारगाव (बु.) येथील प्रफुल्ल सोनकर, भेंडाळा येथील संजय उरकुडे या शेतकऱ्यांच्या शेतात जावून बाधित शेतमालाची पाहणी केली.

पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, आज या परिसरात नुकसानग्रस्त शेतमालाची पाहणी करताना जाणवले की, अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न राहील. पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तात्काळ शासनास पाठवला जाईल. पिडीत शेतक-यांना जास्तीत जास्त अनुदान कसे मिळवून देता येईल, यासाठी निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, विदर्भात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे दाणे अतिशय छोटे असून काही भागात कटाईला सुद्धा परवडणार नाही, अशी सोयाबीनची परिस्थिती आहे. गत महिन्याच्या भरपाईचा निर्णय शासनस्तरावर झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून नुकसानीचा सर्व अहवाल शासन स्तरावर पाठविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

चिमूर तालुक्यात पाहणी दरम्यान आमदार कीर्तीकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. संतोष थीटे, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार श्रीधर राजमाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदी उपस्थित होते. तर वरोरा तालुक्यातील गावांच्या पाहणी दरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार योगेश कौटकर यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

चिमूर आणि वरोरा तालुक्यातील नुकसान : अतिवृष्टीमुळे चिमूर तालुक्यात बाधित क्षेत्र 3017.53 हेक्टर असून बाधित शेतक-यांची एकूण संख्या 3418 आहे. तर वरोरा तालुक्यात एकूण बाधित क्षेत्र 592.25 हेक्टर आणि शेतकरी संख्या 1408 आहे.

००००००

 

 


Join WhatsApp