Pune | Sat, 06 June 2026

No Ad Available

अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचा कुडाळ दौरा

Admin | 6 views
अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचा कुडाळ दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि ५ (जिमाका) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज कुडाळ प्रांत आणि तहसिल कार्यालयांना भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. दौऱ्याची सुरुवात प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

यानंतर श्री. खारगे यांनी तहसील कार्यालयातील विविध महसूल शाखांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी, अभिलेख व्यवस्थापन, ७/१२ दुरुस्ती प्रकरणे, नवीन अकृषिक सुधारणा, जमीन महसूल व शासकीय जमीन विषयक प्रकरणांचा त्यांनी सखोल आढावा घेतला. नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि परिणामकारक सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्री. खारगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत नागरिकांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. प्राप्त होणाऱ्या अर्ज व प्रकरणांचा तातडीने निपटारा करून नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांशीही त्यांनी थेट संवाद साधला. विविध शासकीय सेवांबाबत नागरिकांच्या अडचणी, सूचना व अपेक्षा जाणून घेत प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर दिला.

त्यानंतर त्यांनी प्रांत कार्यालयाला भेट देऊन eQJ Court प्रणालीच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. न्यायालयीन कामकाज अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी कोणत्या सुधारणा करता येतील याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या. यानंतर श्री. खारगे यांनी भूमी अभिलेख कार्यालय, कुडाळ येथे भेट देऊन तेथील विविध कामकाजाची माहिती घेतली. महसूल प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर, सेवा वितरणाची गुणवत्ता आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धती याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही केले.

०००००००

 


ताज्या बातम्या

Join WhatsApp