
बीड, दि. 12 (जिमाका) : पुण्यासोबत पिंपरी-चिंचवड आणि बारामतीसारखा बीडचा विकास स्व. अजित पवार यांच्या मनात होता. त्यांच्या या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी व यंत्रणेने काम करावे असे भावनिक आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हयाच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केले. या बैठकीत सन 2026-2027 चा आराखडा सादर करण्यात आला व चालू आर्थिक वर्षाच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. चालू आर्थिक वर्षात 575 कोटींचा नियतव्य प्राप्त असून यातील 565 कोटी 41 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
आज दूरदृश्य प्रणालीव्दारे ही बैठक झाली. बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा यांची मुंबईतून तर खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती. समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मुंबईत याबाबतचे सादरीकरण केले.
बैठकीत प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा परिचय देणारी चित्रफित दाखवण्यात आली. परळी मतदार संघाचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी शोकप्रस्ताव मांडला. याप्रसंगी सर्व लोक प्रतिनिधींनी आपापल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर सभागृहात दोन मिनिटे मौन पाळून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

दुरदृश्य प्रणालीव्दारे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांची उपस्थिती होती. अत्यंत भावूक वातावरणात झालेल्या या सभेस बीड येथील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. सुधाकर चिंचाणे यांच्यासह सर्व खातेप्रमुखांची उपस्थिती होती.
अजितदादांना बीड जिल्हयाविषयी विशेष ओढ होती. या जिल्हयाचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यांचे ते जिल्हयाचा विकास करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकदिलाने आणि प्रमाणिकपणे काम करावे, असे आवाहन सुनेत्रा अजित पवार यांनी याप्रसंगी केले. त्यांची विकासगंगा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे त्या म्हणाल्या.
यावेळी कामकाजाचा आढावा सादर करताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की सन 2025-2026 साठी मंजूर नियतव्यय सर्वसाधारण गटासाठी 575 कोटी रूपये इतका आहे. यातील 565 कोटी 41 लक्ष रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून 199 कोटी 64 लक्ष इतकी रक्कम खर्च झाली आहे. हे प्रमाण नियतव्ययाच्या 34.72 टक्के इतके आहे.
अनुसूचित जाती योजना अंतर्गत 129 कोटी नियतव्यय असून प्रशासकीय मान्यता 81 कोटी 57 लक्ष आहे. हे प्रमाण 52.20 टक्के इतके आहे.
जिल्हा वार्षिक योजना ओटीएसपी अंतर्गत 2 कोटी 39 लक्ष रुपये निधी प्राप्त झालेला असून 2 कोटी 19 लक्ष रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 61 लक्ष रुपये खर्च झालेले आहे. खर्चाची टक्केवारी 25.69 टक्के इतकी आहे.
या बैठकीत 2026- 2027 चा प्रारुप आराखडा सादर करण्यात आला. यंदा नियोजन विभागातर्फे 481 कोटी 62 लक्ष कमाल आर्थिक नियतव्यय निर्धारित करुन दिला आहे. त्यानुसार आराखडा नियोजन करण्यात आला असून आज तो बैठकीत सादर झाला. यानंतर जिल्हयाच्या वतीने आता तो राज्यस्तर बैठकीत सादर करण्यात येणार आहे. यात 370 कोटींच्या निधीची अतिरिक्त मागणी जिल्हा नियोजन समितीने केली आहे.
0000
