Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे समाजात सेवाभाव निर्माण करा –  पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Admin | 23 views
आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे समाजात सेवाभाव निर्माण करा –  पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. २८ (जि. मा. का.) : आरोग्य सेवेसारखे पुण्य कामच नाही, त्यासाठी यावर सर्वांनी काम केले पाहिजे. प्रत्येक संस्था, व्यक्ती यांनी समाजाच्या प्रश्नावर काम करणे आवश्यक असून माणसांच्या मनामध्ये विविध उपक्रमाद्वारे इतरांबद्दल सेवाभाव निर्माण करावा. खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्यसेवेतून आपण माणसांचे आयुष्य वाढवून त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत. यासाठी आरोग्य सुविधांशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांच्या संकल्पनेतून धर्मादाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर व धर्मादाय उप आयुक्त कार्यालय सांगली यांच्यावतीने संजय भोकरे अभियांत्रिकी महाविद्यालय मिरज येथे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर-2025 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, संजय भोकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संजय भोकरे, कोल्हापूर धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार, सांगली धर्मादाय उप आयुक्त डॉ. मनिष पवार, सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रियांगिनी पाटील, ऋषिकेश हिंगणगावकर, व शरद वाळके, अधीक्षक राहूल पाटील, प्रताप पवार, रूग्णालय निरीक्षक सचिन पाटील आदि उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आजारीच पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर गावागावांमध्ये योगासने, विपश्यना याकडे जावे लागेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर विशेष ध्यान देणे गरजेचे आहे. याबाबत लहान मुलांवरही चांगल्या आरोग्य सवयी लावाव्यात. आजारी पडू नये यासाठी काळजी, आजारी पडल्यानंतरची काळजी व आजारपण संपल्यानंतरची काळजी घेणे आवश्यक आहे. धर्मादाय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून पुढे येऊन शासकीय कामाच्या व्यतिरिक्त हा विशेष उपक्रम राबविल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

धर्मादायच्या अधिकाऱ्यांना मोठे अधिकार आहेत ते त्यांनी वापरावेत असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शासकीय जागेत असलेल्या धर्मादाय रूग्णालयांना गोर, गरीब गरजू रूग्णांना २० टक्के बेड राखीव ठेऊन त्यांच्यावर मोफत उपचार करणे असा कायदा आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी गरजूंना याचा लाभ मिळतो का याची वेळोवेळी तपासणी करावी. कोरोनापासून आरोग्याच्या सर्व सुविधा वाढल्या आहेत. माणुसकीला धरून असणाऱ्या सद्याच्या काळामध्ये प्रचंड मोठी आवश्यकता असणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून या आरोग्य शिबीरातून तपासणीअंती पुढील उपचार आवश्यक असणाऱ्या रूग्णांसाठी आवश्यक व्यवस्था करावी, असे ते यावेळी म्‍हणाले.

या शिबिरामध्ये सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सांगली च्या अधिनस्त सर्व धर्मादाय रुग्णालये सहभागी झाली असून या शिबिरात मोफत सर्व रोग (हृदयरोग, कॅन्सर, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्रचिकित्सा, दंतरोग, बालरोग, आयुर्वेदिक, होमिओपॅथी इ.) निदान या सर्व प्रकारच्या रोगांवर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून औषधोपचार मोफत देण्यात येतील. आवश्यकतेनुसार रुग्णांवर नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयामार्फत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तसेच रक्तदान शिबिरही आयोजित केले आहे.

प्रारंभी फीत कापून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी शाहीर बजरंग आंबी यांनी पोवाड्याच्या माध्यमातून आरोग्याचे महत्व विशद केले.

प्रास्ताविकात धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार यांनी या मोफत शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले. कार्यक्रमास धर्मादाय कार्यालयाचे  अधिकारी, कर्मचारी तसेच धर्मादाय रूग्णालयाचे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000


Join WhatsApp