Pune | Sun, 07 June 2026

No Ad Available

आदिवासी विकास विभाग हा शासकीय विभाग नसून एक कौटुंबिक परिवार’ – आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोक वुईके

Admin | 11 views
आदिवासी विकास विभाग हा शासकीय विभाग नसून एक कौटुंबिक परिवार’ – आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोक वुईके

ठाणे दि.७ (जिमाका):-“आदिवासी विकास विभाग हा केवळ शासन निर्णय आणि फाईल्सपुरता मर्यादित विभाग नसून तो एक मोठा ‘परिवार’ आहे. १९८३ साली या विभागाची स्वतंत्र स्थापना झाल्यापासून आजवर शिक्षक, गृहपाल, विद्यार्थी ते सचिव आणि मंत्र्यांपर्यंत आपण सर्वजण या कुटुंबाचे सदस्य आहोत. जोपर्यंत आपल्यात कौटुंबिक संवाद, विश्वास आणि स्नेह निर्माण होत नाही, तोपर्यंत विभागाचे कार्य खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही,” असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोक वुईके यांनी आज शहापूर येथे केले.

आदिवासी आश्रमशाळांची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढवण्यासाठी आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आदिवासी विकास विभागाचे सचिव विजयती वाघमारे, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोडे, अपर आयुक्त गोपिचंद कदम (प्रकल्प कार्यालय शहापूर), वैशाली खत्री (प्रकल्प कार्यालय शहापूर),  डहाणू प्रकल्प अधिकारी  डॉ. अपूर्वा बासुर(पी.ओ. शहापूर), उपसचिव र.तु.जाधव, सहसचिव शंकर जाधव, अपर आयुक्त मुख्यालय नाशिक दिगंबर चव्हाण, अधिक्षक अभियंता नाशिक श्री. दळवी, कार्याध्यक्ष उमेश जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोक वुईके यांनी आपल्या भाषणातून विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना आत्मचिंतनाचे आवाहन केले.१९८३ पासून स्वतंत्र झालेल्या या विभागातील शिक्षक, गृहपाल, मुख्याध्यापक आणि अधिकारी यांनी एकमेकांशी संवाद वाढवणे गरजेचे असून, ‘इगो’ बाजूला सारून सर्वांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विभागावर होणारी टीका आणि अपप्रचार थांबवण्यासाठी कोणाला शिक्षा करण्यापेक्षा, आपण स्वतःमध्ये काय बदल करू शकतो याचे आत्मपरीक्षण या कार्यशाळेतून व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विशेषतः इंजिनिअरला प्रकल्प अधिकारी माहीत नसणे किंवा इमारती बांधून तयार असूनही केवळ समन्वयाअभावी त्या हस्तांतरित न होणे, यांसारख्या प्रशासकीय त्रुटी संवादाच्या माध्यमातून कायमस्वरूपी दूर केल्या जातील, असा विश्वास त्यांनी दिला.

विभागाच्या नियोजनात आणि आर्थिक शिस्त लावण्यात महिला अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या कौशल्याचे कौतुक करताना डॉ. उईके म्हणाले की, कुटुंबाची तिजोरी ज्याप्रमाणे महिलांकडे सुरक्षित असते, तसेच विभागाचे सूक्ष्म नियोजन महिला अधिकारी उत्तम करत आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि त्यांना मिळणारे दर्जेदार शिक्षण हीच आपली नैतिक जबाबदारी असून १५ जूनला शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व सोयी-सुविधांचे नियोजन पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आमदार दौलत दरोडा यांच्या कार्याचा गौरव करतानाच, “मी आज इथे मंत्री म्हणून नाही, तर तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आलो आहे आणि जोपर्यंत शेवटच्या घटकाची अडचण ऐकून घेतली जात नाही, तोपर्यंत मी येथून हलणार नाही,” असे म्हणत त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांची मने जिंकली. या कार्यशाळेतून मिळालेली ऊर्जा आगामी काळात आश्रमशाळांच्या परिवर्तनासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मंत्री महोदयांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यशाळेला संबोधित करताना आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी स्पष्ट केले की, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अपर आयुक्त स्तरावर अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून शासन, प्रशासन आणि प्रत्यक्ष जमिनी स्तरावर काम करणारे ‘फुट सोल्जर’ म्हणजेच शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यात एकवाक्यता निर्माण केली जात आहे. विद्यार्थी हाच या संपूर्ण प्रक्रियेचा केंद्रबिंदू असून जेव्हा सर्व घटक एकाच दिशेने विचार करतात, तेव्हा कामाला खरी गती मिळते. समस्या कधीच पूर्णपणे संपत नसतात, परंतु त्यांचा बाऊ न करता विषम परिस्थितीतून मार्ग काढत पुढे जाणे महत्त्वाचे आहे. शासन सोयी-सुविधा पुरवण्यामध्ये कोणतीही कमतरता ठेवणार नाही आणि १५ जूनला शाळा सुरू होताच सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे साहित्य व सोयी-सुविधांसह स्वागत करण्यासाठी विभाग पूर्णतः सज्ज आहे. शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी नमूद केले की, केवळ सक्ती करण्याऐवजी शिक्षकांना स्वतःला तिथे राहून काम करण्याची प्रेरणा मिळेल अशी व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला जात असून याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील. तसेच, विभागाच्या वतीने तयार केलेली ‘जिंगल’ आणि प्रचार साहित्य सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचवून शाळा प्रवेशाचा संदेश प्रभावीपणे पसरवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविक भाषणात आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी कार्यशाळेबाबत माहिती दिली. तसेच कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

0000000000

 


Join WhatsApp