Pune | Sun, 07 June 2026

No Ad Available

आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकासाच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्याला विकासाचे रोल मॉडेल बनवूया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Admin | 6 views
आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकासाच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्याला विकासाचे रोल मॉडेल बनवूया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. १: भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्र राज्य या प्रगतीचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या या कर्मभूमीत आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्याला राज्याच्या नकाशावर विकासाचे रोल मॉडेल बनवूया, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, जैन अल्पसंख्यांक अर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन ललित गांधी, आमदार शिवाजी पाटील, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धूनचे वादन करण्यात आले. तसेच राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हस्ते गौरविण्यात आले. पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती, नागरिक, विद्यार्थी, पालक व पत्रकार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच जिल्हावासियांना उद्देशून भाषण केले.
पालकमंत्री आबिटकर यांनी आपल्या भाषणात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात मिळवलेला प्रथम क्रमांक ही अभिमानाची गोष्ट आहे. जिल्ह्यात आयटी पार्कच्या कामाला गती मिळत असून आता सर्किट बेंचही झाले आहे. पर्यटन, उद्योग, आरोग्य क्षेत्रात आपण गतीने पुढे जात आहोत. ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ आणि ‘सौर कृषी वाहिनी’च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत आहोत. आरोग्य मंत्री म्हणून काम करताना ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ ही लोकचळवळ आपण उभारली असून, महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आता प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. तसेच महसूल विभागातील ‘डीम्ड एनए’ आणि अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान पालकमंत्री महोदयांनी निरीक्षण जीपमधून संचलनाची पाहणी केली.
००००

Join WhatsApp