
मुंबई, दि. २१ : देशातील युवक-युवतींमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता आहे. भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ ही मोठी ताकद असून तिचा प्रत्यय या स्पर्धेतील कलाकृतींमधून स्पष्टपणे येतो असे गौरवद्गगार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काढले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ या राष्ट्रीय पोस्टर डिझाईन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न झाला. तेव्हा ते बोलत होते. यावेळी स्पर्धेतील 75 विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

देशाच्या प्रगतीचे आणि दूरदृष्टीचे कलात्मक पद्धतीने सादरीकरण करून ‘विकसित भारत’ या संकल्पनेला प्रोत्साहन देणे हा या राष्ट्रीय पोस्टर डिझाईन स्पर्धेचा उद्देश होता. ही स्पर्धा 20 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. देशभरातून सुमारे 3 हजार नोंदी प्राप्त झाल्या.
आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, योग, वेव्ह्ज समिट, मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि हवामान बदल या नऊ विषयांवर कलाकृती सादर करण्यात आल्या.
या स्पर्धेचे मूल्यमापन अच्युत पालव, वासुदेव कामत, सुधारक ओलवे, प्रसून जोशी, रवी जाधव, भरत दाभोलकर, गौरव दालमिया आणि श्रीनिवासन स्वामी या मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मंत्री ॲड.आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्पर्धेतील निवडक कलाकृतींच्या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आयुष्य देशसेवेसाठी समर्पित असून त्यांच्या प्रेरणेने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य विभाग आणि चित्रनगरीच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
या स्पर्धेतील कलाकृतींचे प्रदर्शन राज्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत असून सीएसआर अंतर्गत सात संस्थांना एकूण 65 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले की, बक्षीस निधी असो किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून दिला जाणारा निधी असो, सर्वांचे ध्येय देशाच्या प्रगतीशी निगडित आहे. ‘विकसित भारत’ या संकल्पनेचे प्रभावी प्रतिबिंब या स्पर्धेतील कलाकृतींमध्ये पाहायला मिळते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांनी केले.
000
संजय ओरके/विसंअ
