
राज्य शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबवला जात आहे. हा काळ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने निवडला गेला आहे. गांधीजींच्या सेवाभावाच्या तत्त्वज्ञानाचा आणि मोदीजींच्या विकासाभिमुख विचारांचा संगम साधणारा हा उपक्रम महाराष्ट्राच्या शासन-प्रशासनाला लोकाभिमुख, कार्यक्षम आणि अधिक पारदर्शक करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे…
नागरिक आणि शासन यांच्यातील धागा
महसूल विभाग हा सामान्य नागरिकांच्या जीवनाशी नित्यनेमाने जोडलेला आहे. शेतकऱ्याला शेताचा सातबारा हवा असतो, विद्यार्थ्याला शाळेत प्रवेशासाठी दाखला, घरकुलासाठी जमीनपत्र किंवा दस्तनोंदणीसाठी सुलभ प्रक्रिया हे सारे प्रश्न महसूल विभागाशी निगडित आहेत. म्हणूनच या विभागाचे कामकाज जितके जलद, पारदर्शक आणि संवेदनशील असेल तितकीच जनतेची शासकीय यंत्रणेवरील नाळ घट्ट होईल. शेतकऱ्याच्या घामाला बाजारपेठ मिळावी, विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने साकारावित, महिलांना घरकुलाचा आधार मिळावा आणि दुर्बल घटकांना न्यायाचा मार्ग खुला व्हावा ही सारी जबाबदारी महसूल विभागाने आपल्या खांद्यावर घेतली आहे. सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून ही जबाबदारी जनआंदोलनाच्या रूपात साकार होत आहे.
बदलता चेहरामोहरा
अलीकडच्या काळात महसूल विभागाने घेतलेले निर्णय जनतेच्या व शासनाची नाळ घट्ट करणारे ठरले आहेत.
जिवंत सातबारा – शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा उतारा थेट ऑनलाईन उपलब्ध करून दिला.
सलोखा योजना – दस्तनोंदणीतील वाद मिटवून शांतता व विश्वासाची नवी परंपरा निर्माण केली.
ड्रोन सर्वेक्षण – गौण खनिजांचे अचूक मोजमाप करून प्रशासनाची विश्वासार्हता वाढवली.
विद्यार्थ्यांसाठी मुद्रांक शुल्क माफी- गरिबांच्या स्वप्नांना बळ दिले.
प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला रस्ता – ग्रामीण विकासाला नवीन दिशा दिली.
हे निर्णय केवळ तांत्रिक नव्हते; ते समाजमनाला स्पर्श करणारे ठरले आहेत. आता सेवा पंधरवड्यातून हेच प्रयत्न अधिक व्यापक स्वरूपात जनतेसमोर येत आहेत.
तीन टप्पे, एक ध्येय
पाणंद रस्ते : शेतकऱ्यांसाठी विकासाचे प्रशस्त मार्ग (१७ ते २२ सप्टेंबर)
या टप्प्यात शेतरस्त्यांचे सीमांकन, प्रलंबित प्रकरणांची लोकअदालतीतून सोडवणूक आणि ७/१२ उताऱ्यावर रस्त्यांची कायमस्वरूपी नोंदणी केली जाणार आहे. शासनाचा उद्देश स्पष्ट आहे की, प्रत्येक शेतकऱ्याला शेतात पोहोचण्यासाठी कायदेशीर मान्यता असलेला रस्ता मिळावा. नंदुरबारच्या शनिमांडळ येथील शांताराम पाटील या शेतकऱ्याचे शब्द याचे सार सांगतात “आजपर्यंत आम्ही शेतात जाण्यासाठी पायवाटेवर अवलंबून होतो. आता शासनाने दिलेल्या रस्त्यामुळे आमच्या घामाला बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे.”
सर्वांसाठी घरकुलाचा दीप (२३ ते २७ सप्टेंबर)
घर हा केवळ निवारा नाही, तर सुरक्षिततेचा आणि स्थैर्याचा आश्वासक दीप आहे. शासन या टप्प्यात शासकीय जमिनींचे कब्जेहक्काने वाटप करणार आहे. नियमांनुसार अतिक्रमणांचे नियमितीकरण करून अनेक कुटुंबांना घरकुलाचा हक्क दिला जाणार आहे.
नवापूरच्या संगिता गावित सांगतात “आजवर छप्पर होतं, पण घर नव्हतं. शासनाने दिलेला हा पट्टा म्हणजे माझ्या मुलांच्या आयुष्याचा किल्ला आहे.”
नावीन्यपूर्ण उपक्रम : जिल्ह्याचा आत्मा जागवणारे प्रयोग (२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर)
या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्याच्या गरजेनुसार उपक्रम राबविले जाणार आहेत. कुठे शाळांना तंत्रज्ञानाची साथ मिळेल, कुठे दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचेल, कुठे पर्यावरणसंवर्धनाची शपथ घेतली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने प्रत्येक जिल्हा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल.
यात नंदुरबार जिल्ह्यात पुढील उपक्रम राबविले जातील…
महसूल विभाग: दाखले वितरण, जमिनीच्या नोंदीतील दुरुस्ती, वारसा दाखल्यांचे निवारण, प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा.
आरोग्य विभाग: दुर्गम पाड्यांमध्ये आरोग्य शिबीरे, सिकलसेल आजार जनजागृती, माता-बाल आरोग्य तपासणी, लसीकरण मोहीम.
कृषी विभाग: नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, सेंद्रिय खत वापर, हवामान आधारित सल्ला, शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPOs) प्रोत्साहन.
महिला व बालविकास विभाग: कुपोषण निर्मूलन मोहिमा, बचतगटांचे प्रदर्शन, महिला उद्योजकतेला चालना.
शिक्षण विभाग: शाळा स्वच्छता अभियान, विद्यार्थी रॅली, डिजिटल शिक्षणविषयक उपक्रम.
सामाजिक न्याय विभाग: दिव्यांगांसाठी कॅम्प, अपंग प्रमाणपत्र वाटप, शिष्यवृत्ती व लाभ योजनेचे मार्गदर्शन.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग: गावोगावी लोकसहभागातून ग्रामसभा, शासकीय योजनांचा आढावा, स्वच्छता उपक्रम.
सहभागाची नवी ऊर्जा
सेवा पंधरवड्याचे यश नागरिकांच्या सहभागावर अवलंबून आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून तहसीलदारांपर्यंत, उपविभागीय अधिकाऱ्यांपासून महसूल मंडळांपर्यंत प्रत्येक अधिकारी सज्ज आहे. लोकप्रतिनिधी, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता ही या अभियानाची खरी ताकद आहे. यंत्रणेतील प्रत्येक घटकाने या पंधरवड्याला आपली चळवळ मानून कार्य सुरू केले आहे. “शासन जनतेच्या दारी” ही घोषणा आता वास्तवात उतरते आहे.
खरा आत्मा
या पंधरवड्याचा खरा आत्मा नागरिकांच्या डोळ्यांतील चमक आहे. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर रस्त्यामुळे उमटलेले समाधानाचे हास्य, घरकुलाच्या किल्ल्या मिळाल्यावर आईच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू, विद्यार्थ्याच्या हातात मिळालेल्या दाखल्यामुळे उजळलेले भविष्य, दुर्बल घटकांच्या आयुष्यात निर्माण झालेली सुरक्षिततेची भावना ही सारी दृश्ये ‘सेवा पंधरवडा’ च्या यशाची खरी कहाणी सांगणारे आहेत.
‘सेवा पंधरवडा’ हा महाराष्ट्राच्या शासन-प्रशासनाचा दीपस्तंभ ठरेल. गांधीजींच्या सेवाभावाचा आणि मोदीजींच्या विकासाभिमुखतेचा संगम या उपक्रमातून साधला जात आहे. शासन आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्याची ही ऐतिहासिक संधी आहे. हा पंधरवडा म्हणजे जनतेच्या हातात हात घालून पुढे जाणारा प्रवास आहे. असा प्रवास जो शेतकऱ्याच्या घामाला दिशा देतो, गरीबांच्या आयुष्याला आश्रय देतो, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देतो आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाला नवा वेग देतो “सेवा पंधरवडा” हा केवळ कार्यक्रम नाही, तर तो महाराष्ट्राच्या लोकाभिमुख प्रशासनाचा नवा अध्याय आहे-असा अध्याय जो राष्ट्राच्या पुनरुत्थानाला नवी उमेदीची, नव्या विश्वासाची आणि नव्या सेवाभावाची संजीवनी देणार आहे.
०००
- रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार
