Pune | Sun, 07 June 2026

No Ad Available

‘नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!’ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Admin | 12 views
‘नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!’ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पुणे, दि. ३० : उन्हाळ्यात बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना ‘नाथजल’चे थंडगार पाणी केवळ १५ रुपयांना मिळाले पाहिजे. किंमत वाढवून विक्री करताना आढळल्यास संबंधितांचा विक्री परवाना रद्द केला जाईल, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला.

परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी पुणे विभागातील लोणावळा बसस्थानकास भेट देऊन तेथील प्रवासी सेवा-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला असता, बसस्थानकावर विक्री होत असलेली ‘नाथजल’ची एक लिटरची थंड पाण्याची बाटली २० रुपयांच्या वाढीव दराने विकली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी संबंधित विक्रेत्यास स्पष्ट दरफलक लावण्याच्या सूचना देत, पुढे १५ रुपयांची बाटली अधिक दराने विक्री केल्यास विक्री परवाना रद्द केला जाईल, असा इशारा दिला.

तसेच, लोणावळा बसस्थानकावर येणाऱ्या काही बसफेऱ्या बसस्थानकात न येता पुढे जात असल्याची तसेच काही बसेस जाणीवपूर्वक खाजगी हॉटेलांवर थांबत असल्याची तक्रार प्रवाशांनी यावेळी मांडली. या हॉटेलांवरील महागडे खाद्यपदार्थ प्रवाशांना परवडत नसल्यामुळे, वेळापत्रकातील सर्व बसफेऱ्या नाश्त्यासाठी लोणावळा बसस्थानकावरच थांबाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली. त्यानुसार, कोणतीही बस खाजगी हॉटेलांवर न थांबता नियोजित वेळापत्रकानुसार लोणावळा बसस्थानकावरच थांबावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी एसटी प्रशासनाला दिले.

या पाहणीदरम्यान त्यांनी बसस्थानकातील स्वच्छता, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा, तिकीट व्यवस्था तसेच इतर मूलभूत सोयींचा सविस्तर आढावा घेतला. प्रवाशांना अधिक दर्जेदार व सुलभ सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांनी बसस्थानकातील कर्मचाऱ्यांशी तसेच प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रवासी सेवेत अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

00000

 


Join WhatsApp