Pune | Sat, 14 February 2026

No Ad Available

‘हिंद-दी-चादर’ समागमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांना सहकार्य करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

Admin | 6 views
‘हिंद-दी-चादर’ समागमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांना सहकार्य करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, दि. १२ : नवी मुंबईतील खारघर येथे दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजित ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर, सर्व समाजघटकांतील भाविकांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि त्यांना अनुषंगिक सर्व सहकार्य मिळावे, या दृष्टीने यंत्रणांनी चोख नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

या ऐतिहासिक कार्यक्रमास देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधी, शीख, सिकलगीर यांसह नऊ विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, माहिती उपसंचालक प्रवीण टाके, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा गौरवशाली इतिहास आणि त्यांचे बलिदान नव्या पिढीला ज्ञात व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये त्यांच्या जीवनकार्यावर आधारित गीतगायन, चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धा आणि प्रभात फेऱ्यांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी या उपक्रमांच्या व्यापक प्रसिद्धीसाठी दररोजची छायाचित्रे संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश दिले असून, शैक्षणिक संस्थांमध्ये सतिंदर सरताज यांचे गाणे व माहितीपट दाखवून जनजागृती करावी, असेही स्पष्ट केले. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित करून सामाजिक संघटनांशी सातत्याने समन्वय राखण्यावर त्यांनी भर दिला.

या शताब्दी वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने खुली व महाविद्यालयीन अशा दोन गटांत निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपले साहित्य २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत hinddichadarkolhapur@gmail.com या ई-मेलवर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले असून जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे प्रशासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

विभागीय माहिती कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन

हिंद-दी-चादर अर्थात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दीनिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्य शासनाने क्षेत्रीय आयोजन समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आठ सदस्यांचा समावेश आहे.

खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोल्हापूर वासियांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग कशा पद्धतीने नोंदविता येईल यासाठी विचारविनिमय करण्यासाठी विभागीय माहिती कार्यालय या ठिकाणी शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी क्षेत्रीय समितीतील सर्व सदस्यांना निमंत्रित केले आहे. दरम्यान हिंद-दी-चादर या कार्यक्रमाची व्यापक व विपुल प्रमाणावर प्रसिद्धी होण्याच्या अनुषंगाने आणि गुरु तेग बहादुर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी विभागीय माहिती कार्यालयाकडून निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खुल्या व महाविद्यालयीन अशा दोन गटामध्ये होणाऱ्या या स्पर्धेत स्पर्धक आपले निबंध व घोषवाक्य हे 25 फेब्रुवारीपर्यंत विभागीय माहिती कार्यालयात hinddichadarkolhapur@gmail.com  या ई-मेल वर पाठवू शकतील. इच्छुकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000


Join WhatsApp