Pune | Sat, 14 February 2026

No Ad Available

‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश

Admin | 6 views
‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश

छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका)- ‘’गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानाच्या माध्यमातून आम्ही किशोरवयीन मुलींच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचेल याची खात्री करत आहोत. आपल्या मुलींचे संरक्षण करणे हे आपले नैतिक आणि सामाजिक दायित्व आहे. कॉर्पोरेट घटकांनी CSR च्या माध्यमातून या अभियानात सहभागी व्हावे आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्धच्या आपल्या सामूहिक लढ्याला बळ द्यावे.’, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा विस्तार सुरू असून, पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांनंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाही अधिकृत समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सामंजस्य करार (MOU) स्वाक्षरीत करण्यात आला असून, लवकरच जिल्ह्यात अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.

विशेष उल्लेखनिय बाब म्हणजे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या मोहिमेला गती देण्यासाठी ‘क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण’ (CreditAccess Grameen) संस्थेने मोलाचा हातभार लावला आहे. त्यांनी आपल्या सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी २४५० एचपीव्ही लसींचे (HPV Vaccine Doses) प्रायोजन (Support) केले आहे. त्यांच्या या महत्वपूर्ण सहकार्यामुळे गरजू मुलींना विनामूल्य लसीकरणाचा लाभ मिळणे सहज शक्य होणार आहे.

भारतामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. दर ८ मिनिटांनी एका महिलेला या आजारामुळे जीव गमवावा लागत असून, दररोज सुमारे २०० महिलांचा मृत्यू होत आहे. हा कर्करोग देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. मात्र, वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि एचपीव्ही लसीकरणाच्या माध्यमातून हा कर्करोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश्य म्हणजे लवकर जागरूकता, वेळेवर प्रतिबंध आणि ९ ते १४ वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण करून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा समूळ नायनाट करणे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील लाखो मुलींच्या आरोग्याचे आणि भविष्यातील सुरक्षिततेचे संरक्षण करण्यासाठी एक व्यापक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मॉडेल उभे राहत आहे.

या अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये जीविका फाउंडेशन (जीविका हेल्थकेअर) राज्याचा अंमलबजावणी भागीदार (Implementing Partner) म्हणून काम करत आहे. शासनासोबत समन्वय साधून जनजागृती, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि समुदाय पातळीवर विश्वास निर्माण करण्यासाठी जीविका फाउंडेशन सक्रियपणे कार्यरत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य व शिक्षण विभागांच्या समन्वयाने शाळा आणि समुदाय स्तरावर लसीकरण मोहीम, पालकांसाठी जागरूकता सत्रे आणि माहितीपर उपक्रम राबवले जाणार आहेत. यामुळे एचपीव्ही लसीबाबत समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या समावेशामुळे, १० प्राधान्य जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणाऱ्या या राज्यव्यापी अभियानाला अधिक गती मिळणार असून, भविष्यात महाराष्ट्र गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध एक आदर्श राज्य म्हणून उभे राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

०००००


Join WhatsApp