Pune | Wed, 22 April 2026

No Ad Available

‘एमटीडीसी’मार्फत हरिहरेश्वर येथे खगोल दर्शन महोत्सवाचे २४ ते २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजन -पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Admin | 4 views
‘एमटीडीसी’मार्फत हरिहरेश्वर येथे खगोल दर्शन महोत्सवाचे २४ ते २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजन -पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई,दि.२२: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन विभागामार्फत आंतरराष्ट्रीय ‘डार्क स्काय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर ‘खगोल दर्शन महोत्सव २०२६’चे आयोजन २४, २५ व २६ एप्रिल २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे करण्यात आले आहे.या पर्यटन महोत्सवात खगोलप्रेमी व पर्यटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), ॲस्ट्रॉनइरा आणि डार्क स्काय इंटरनॅशनल यांच्या विद्यमाने डार्क स्काय सप्ताह हा उपक्रम राबविण्यात येत आहे, तसेच ॲस्ट्रॉनइराच्या संस्थापिका व संचालिका श्वेता कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून स्टारगेझिंग सत्रांचे आयोजन करण्यात येत असून खगोल अभ्यासक, विद्यार्थी व पर्यटनप्रेमींसाठी हा एक अनोखा, ज्ञानवर्धक व अनुभवसमृद्ध उपक्रम ठरणार आहे.

हरिहरेश्वर हे मुंबईपासून सुमारे चार तासांच्या अंतरावर वसलेले शांत, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले कोकणातील पर्यटनस्थळ असून समुद्रकिनारे, हिरवीगार डोंगररांग आणि प्रसिद्ध हरिहरेश्वर मंदिरामुळे ‘देवघर’ म्हणून ओळखले जाते. येथे असलेले एमटीडीसी हरिहरेश्वर रिसॉर्ट समुद्रकिनाऱ्याजवळ व शांत परिसरात वसलेले असून येथे पर्यटकांसाठी प्रीमियर सूट, कॉटेज, सी-फेसिंग कॉटेज व एक्झिक्युटिव्ह रूम्ससह आरामदायी निवास व्यवस्था उपलब्ध आहे. हरिहरेश्वरची व्यापक प्रचार व प्रसिद्धी होऊन देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी या ठिकाणाला अधिक पसंती द्यावी, या उद्देशाने हरिहरेश्वर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम विशेषरित्या आयोजित करण्यात येत असून पर्यावरणपूरक व अनुभवाधारित पर्यटनाला चालना देणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

महाराष्ट्रात प्रथमच होणाऱ्या या महोत्सवात स्टारगेझिंग (आकाश निरीक्षण) सत्रे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खगोल विषयक संवादात्मक प्रदर्शने, प्रकाश प्रदूषण व ‘डार्क स्काय’ संवर्धनावरील माहितीपर उपक्रम तसेच पर्यावरण जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये प्रकाश प्रदूषणाचे दुष्परिणाम, नैसर्गिक अंधाराचे महत्त्व तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. खगोलशास्त्र, पर्यावरण व पर्यटन यांची सांगड घालत हा महोत्सव पर्यटकांना एक वेगळा अनुभव देणार आहे.

या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई व पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे प्रधानसचिव संजय खंदारे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश र. गटणे यांनी केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, विभाग प्रमुख मानसी ताटके, तसेच प्रादेशिक व्यवस्थापक, रत्नागिरी दीपक माने यांच्या समन्वयातून आवश्यक नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत असून, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे सक्रिय सहकार्य लाभत आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ


Join WhatsApp