
परभणी, दि. 30 (जिमाका) : थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्त विकार आहे, मात्र योग्य उपचाराने हा आजार नक्की बरा होतो. आपले महाराष्ट्र राज्य थॅलेसेमिया मुक्त करण्याचा राज्य शासनाने निर्धार केला आहे, त्यादृष्टीने रुग्णांना औषधोपचार सहज व सुलभपणे मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असे प्रतिपादन परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
परभणी शहरातील बी. रघुनाथ हॉल येथे आजपासून दोन दिवसीय “एक पाऊल थॅलेसेमीया मुक्तीकडे” या अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होत्या. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, आय.एम.ए. चे अध्यक्ष तथा बालरोग तज्ञ डॉ. राजगोपाल कालाणी, “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या अभियानाचे राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर, रेवती पिंपळगावकर, डॉ. संतोष पालवे, डॉ. मनोज तोष्णीवाल, डॉ. इशा पटेल, डॉ. हेमलता वाघमारे, संकल्प इंडिया फाऊंडेशनचे अभिजीत अय्यंगार, संतोष हेडगे आदी यावेळी उपस्थित होते. अभियानातंर्गत बोनमॅरो क्रॉसमॅचिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पालकमंत्री म्हणाल्या की, थॅलेसेमिया आजारामुळे रुग्णाच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे त्यांना वारंवार रक्त संक्रमण करावे लागते. या आजारातून रुग्ण बरा होण्यासाठी शासनाने आरोग्यसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आपल्या परभणी जिल्ह्यातील रुग्णांना आता उपचारासाठी बाहेरच्या जिल्ह्यात जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे रुग्णांनी वेळेवर उपचार घ्यावेत. लवकरच या आजाराच्या रुग्णांसाठी आपल्या जिल्ह्यात दहा बेडचे स्वतंत्र रुग्ण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच थॅलेसेमिया रुग्णांना उपचार सुविधा सुलभपणे मिळण्यासाठी त्यांना विशेष आयडी कार्ड देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. थॅलेसेमिया आजाराच्या निदानासाठी शाळांमध्येही विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
थॅलेसेमिया आजाराला रोखण्यासाठी व रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्याकरीता तळमळीने कार्य करणारे श्री. पिंपळगावकर यांचे यावेळी पालकमंत्री यांनी कौतुक केले. आपला महाराष्ट्र थॅलेसेमिया मुक्त करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
प्रारंभी उपस्थित बालकांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन पालकमंत्री यांचा सत्कार करण्यात आला. तर पीसीपीएनडीशी संबंधित उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ॲड. राऊत आणि आशाताईंचा यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. थॅलेसेमियाशी संबंधित पुस्तिकेचेही मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. आज 50 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून रुग्णांचे घेण्यात आलेले 200 नमुने हे तपासणीसाठी जर्मनीत पाठविण्यात येणार आहेत. एक नमुना तपासणीकरीता साधारण वीस हजार रुपये खर्च येतो. मात्र, सर्व नमुने तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, आशासेविका व तपासणीसाठी मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होते. 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 5.00 वा. या कालावधीतही सुरु असणाऱ्या या अभियानाचा रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. पिंपळगावकर यांनी केले.
*-*-*-*-*
